(संगमेश्वर / प्रतिनिधी)
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे निकाल आज (सोमवारी) जाहीर होताच संगमेश्वर तालुक्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने आपली ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली. तालुक्यातील सात जिल्हा परिषद गटांपैकी तीन गटांत उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारांनी विजय मिळवत दिग्गज नेत्यांचा पराभव केला असून, तालुक्यातील राजकारणात या निकालाने मोठी खळबळ उडवली आहे.
कडवई जिल्हा परिषद गटातून शिवसेनेचे संतोष थेराडे यांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार विनोद म्हस्के यांचा पराभव करत आपली विजयी परंपरा कायम राखली. या लढतीत भाजपने मोठी ताकद पणाला लावली होती; मात्र थेराडे यांनी केलेली विकासकामे, गटातील जनतेशी असलेला सातत्यपूर्ण संपर्क आणि तळागाळातील लोकांसाठी केलेल्या कामाचा फायदा त्यांना झाला. निवडणूक काळात केलेल्या आक्रमक प्रचारामुळे त्यांनी दुसऱ्यांदा म्हस्के यांना पराभूत करत आपली पकड अधिक मजबूत केली.
कसबा जिल्हा परिषद गटातील लढत सर्वाधिक लक्षवेधी ठरली. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा रचना राजेंद्र महाडिक यांना शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी देण्यात आली होती. त्यांच्या विरोधात उद्धव ठाकरे शिवसेनेने नवख्या विशाखा विजय कुवळेकर यांना मैदानात उतरवले होते. राजकारणात नवख्या असतानाही कुवळेकर यांनी संपूर्ण गट पिंजून काढत जोरदार प्रचार केला. मतदारांनी पक्षनिष्ठेला प्राधान्य देत कुवळेकर यांच्या पारड्यात कौल दिला. अनुभवी आणि दिग्गज मानल्या जाणाऱ्या रचना महाडिक यांचा पराभव करत कुवळेकर यांनी कसबा गट उद्धव ठाकरे शिवसेनेसाठी अभेद्य असल्याचे ठामपणे दाखवून दिले. हा निकाल शिंदे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
साडवली जिल्हा परिषद गटात विद्यमान सदस्य नेहा रवींद्र माने यांनी पुन्हा एकदा विजय मिळवत आपले स्थान कायम राखले. गटातील मतदारांशी असलेला निकटचा संपर्क, आतापर्यंत केलेली विकासकामे तसेच राज्यमंत्री रवींद्र माने यांनी तालुक्याच्या विकासासाठी केलेल्या प्रयत्नांचा फायदा नेहा माने यांना झाल्याचे स्पष्ट झाले. अनेक नेते शिंदे गटात गेले असतानाही माने दाम्पत्याने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी एकनिष्ठ राहण्याचा निर्णय घेतला होता. मतदारांनीही या निष्ठेला कौल देत नेहा माने यांच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. या निकालानंतर संगमेश्वर तालुक्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा प्रभाव अजूनही कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. तीन जिल्हा परिषद गटांत मिळालेल्या विजयामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, तालुक्यात ठिकठिकाणी जल्लोष करण्यात आला.

