(हैदराबाद / वृत्तसंस्था)
‘कॉक्रोच जनता पार्टी’चे संस्थापक सदस्य काही ‘संत’ नाहीत, त्यांच्या मनात राजकीय महत्त्वाकांक्षा आहेत. मात्र, राजकीय महत्त्वाकांक्षा असणे चुकीचे नाही, असे पर्यावरण अभ्यासक सोनम वांगचुक यांनी म्हटले आहे. एका पॉडकास्टदरम्यान त्यांनी ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या संस्थापक सदस्यांबाबत आपली मते मांडली.
“मला वाटते, त्यांना नक्कीच राजकीय महत्त्वाकांक्षा आहेत. मी त्यांचे बारकाईने निरीक्षण केले आहे. कदाचित त्यात काहीही गैर नाही. त्यांनी त्यांना राजकीय महत्त्वाकांक्षा असल्याचे मला सांगितलेले नाही. हे त्यांच्याबद्दलचे माझे निरीक्षण आहे. त्यांना काहीही नको आहे, असे काही संत नाहीत,” असे वांगचुक म्हणाले.
राजकीय महत्त्वाकांक्षा बाळगण्यात काहीही गैर नसल्याचे सांगत वांगचुक यांनी अधिक तरुण नेत्यांनी राजकीय पक्षांमध्ये सहभागी व्हावे किंवा स्वतःचे राजकीय पक्ष स्थापन करावेत, अशी इच्छाही व्यक्त केली. 59 वर्षीय वांगचुक हे पर्यावरण अभ्यासक आहेत.
वांगचुक यांनी सांगितले की, जेव्हा ते विद्यार्थी चळवळीत सहभागी झाले होते, त्यावेळी टीकाकारांनी ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजित दिपके हे ‘आम आदमी पार्टी’मधून आल्याचे म्हटले होते. मात्र, या गोष्टीचा आपल्यावर कोणताही परिणाम झाला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. यापूर्वी एखाद्या राजकीय पक्षासोबत काम केले असणे यात मुळात काहीही चुकीचे नसल्याचेही त्यांनी म्हटले.
व्यासपीठाचा वापर राजकीय अजेंड्यासाठी नको
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पदावरून हटवण्याच्या मागणीसाठी जवळपास दोन महिने चाललेल्या आंदोलनादरम्यान आपण अभिजित दिपके, सौरव दास आणि आशुतोष रंका यांच्यासोबत काम केले होते, असे वांगचुक यांनी सांगितले. त्यांच्या मनात भविष्यासाठी राजकीय महत्त्वाकांक्षा असल्या तरी आंदोलनाच्या व्यासपीठाचा वापर कोणत्याही विशिष्ट राजकीय पक्षाचा अजेंडा पुढे नेण्यासाठी केला जाणार नाही, याची त्यांनी खात्री करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
‘गजनी’सारखं विस्मरण झालं असावं
दरम्यान, ‘3 Idiots’ या चित्रपटातील ‘चतुर’ची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता ओमी वैद्य यांनी ‘फुंसुख वांगडू’ हे पात्र सोनम वांगचुक यांच्यापासून प्रेरित असल्याचे म्हटले होते. मात्र, अभिनेता आमिर खान यांनी हा दावा फेटाळून लावला होता. या मुद्द्यावरही वांगचुक यांनी प्रतिक्रिया देत आमिर खान यांना टोला लगावला.
“तो ‘गजनी’च्या वेशभूषेत माझे भाषण पाहत होता. कदाचित त्या ‘गजनी’च्या वेशभूषेत असल्यामुळेच त्याला ‘शॉर्ट-टर्म मेमरी लॉस’ (क्षणिक विस्मरण) झालं असावं. कदाचित 15 मिनिटांनंतरच तो आमची भेट विसरला असेल. त्यामुळे मला याचे काहीच आश्चर्य वाटत नाही,” असे वांगचुक यांनी म्हटले.
वांगचुक यांच्या या वक्तव्यामुळे ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या संस्थापक सदस्यांच्या राजकीय भूमिकांबाबत तसेच भविष्यातील राजकीय महत्त्वाकांक्षांबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

