(संगमेश्वर / प्रतिनिधी)
चिपळूण–पाटण मार्गावरील कुंभार्ली घाटात रस्त्याच्या गंभीर दुर्दशेमुळे शुक्रवारी पहाटे सुमारे चार वाजता एका मालवाहू ट्रकचा अवघड वळणावर अपघात होऊन ट्रक रस्त्याच्या मध्यभागी उलटला. या अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक तब्बल आठ तास पूर्णतः ठप्प झाली होती.
अपघातानंतर घाटातून केवळ लहान चारचाकी वाहनांना कसाबसा मार्ग उपलब्ध होता. दोन्ही बाजूंनी शेकडो वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. हा अपघात कुंभार्ली घाटातील मंदिराजवळील खड्डे आणि रस्त्याच्या खराब स्थितीमुळेच घडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
गेल्या आठवडाभरात कुंभार्ली घाटात रस्त्याच्या दुर्दशेमुळे वारंवार अपघात घडले आहेत. घाटातील असंख्य खड्ड्यांमुळे वाहतूक संथ गतीने सुरू असून, तरीही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्याच्या दुरुस्तीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप वाहनचालकांनी केला आहे. आज पहाटे गुजरातच्या दिशेने जाणारा मालवाहू ट्रक वळणावरील खोल चरामध्ये अडकून थेट रस्त्याच्या मध्यभागी उलटला, त्यामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे बंद झाली.
सकाळी साडेअकराच्या सुमारास कराडच्या दिशेने जाणाऱ्या एका कंटेनरवरील पोकलेनच्या सहाय्याने वळणावरील चरामध्ये तात्पुरती माती टाकण्यात आली, त्यानंतर दुपारी बारा वाजल्यानंतर काही बस मार्गस्थ झाल्या. मात्र पहाटे चार ते दुपारी बारा या आठ तासांत सर्व मालवाहक ट्रक घाटाच्या दोन्ही टोकांवर अडकून पडले होते.
अपघातस्थळी अलोरे व शिरगाव पोलीस ठाण्याचे कर्मचारी आणि होमगार्ड उपस्थित राहून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणतीही तातडीची मदत मिळाली नाही, अशी तीव्र नाराजी वाहनचालकांनी व्यक्त केली. अपघात घडून तब्बल आठ तास उलटूनही क्रेन घटनास्थळी पोहोचू न शकल्याने प्रशासनाच्या हलगर्जीपणावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दरम्यान, ट्रक उलटल्यामुळे टँकमधील डिझेल रस्त्यावर सांडल्याने दुचाकी व चारचाकी वाहने घसरत होती, त्यामुळे संपूर्ण परिसर अत्यंत धोकादायक बनला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्क्रियतेमुळे केवळ नशिबाने मोठी दुर्घटना टळली, अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली.
येत्या आठवडाभरात कुंभार्ली घाट रस्ता तातडीने दुरुस्त न केल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता रास्तारोको आंदोलन छेडले जाईल, असा इशारा संतप्त वाहनचालकांनी दिला आहे.

