(रत्नागिरी / प्रतिनिधी )
कोकणातील चिरेखाण व्यवसायातील अडचणी दूर करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना पाणीसाठ्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी गौण खनिज नियमावलीत महत्त्वपूर्ण बदल करण्याच्या प्रस्तावांना समितीने मंजुरी दिली आहे. जांभा दगडाच्या उत्खननावरील ३० टक्के रॉयल्टी सरसकट माफ करण्यासह उत्खननानंतर तयार होणाऱ्या चिरेखाणींचा नैसर्गिक तलाव म्हणून वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या तलावांमध्ये पावसाचे पाणी साठवण्यासाठी शासनाकडून ताडपत्री उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावालाही मान्यता मिळाली आहे. आमदार भास्कर जाधव यांनी सातत्याने केलेल्या मागण्यांना यामुळे यश मिळाले आहे.
राज्याच्या गौण खनिज नियमावलीत सुधारणा करण्यासाठी शासनाने स्थापन केलेल्या समितीची तिसरी बैठक महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत समितीचे सदस्य आमदार भास्कर जाधव यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभाग घेत चिरेखाण व्यावसायिकांच्या अडचणी आणि शेतकऱ्यांच्या पाण्याच्या प्रश्नांवर उपाययोजना सुचवल्या.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत जांभा दगडाचे उत्खनन मोठ्या प्रमाणावर होते. मात्र, जमिनीखाली असलेल्या या दगडाचे उत्खनन करताना निम्म्याहून अधिक दगड फुटतात. त्यामुळे चिरेखाण व्यावसायिकांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागते. या नुकसानीचा विचार करून जांभा दगडावरील ३० टक्के रॉयल्टी सरसकट माफ करण्याची मागणी जाधव यांनी केली होती. समितीने या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत मान्यता दिली.
उत्खनन पूर्ण झाल्यानंतर तयार होणाऱ्या चिरेखाणींचे खड्डे बुजवण्याऐवजी त्यांचा पाणीसाठ्यासाठी उपयोग करण्याची संकल्पनाही बैठकीत मांडण्यात आली. या खाणींना नैसर्गिक तलावाचा दर्जा देऊन त्यामध्ये पावसाचे पाणी साठवता यावे, यासाठी शासनाने ताडपत्री उपलब्ध करून द्यावी, अशी सूचना जाधव यांनी केली. या पाणीसाठ्याचा फायदा परिसरातील विहिरी आणि बोरवेलच्या पाणीपातळीत वाढ होण्यासाठी होऊ शकतो. त्याचबरोबर काजू, साग आणि खैर यांसारख्या वृक्षांच्या लागवडीसाठीही या पाण्याचा उपयोग करता येणार आहे.
दरम्यान, चिरेखाणी आणि वाळू उत्खननावरील रॉयल्टी कायमस्वरूपी माफ करण्याची मागणी आमदार भास्कर जाधव यांनी पुढेही कायम ठेवली आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतून चिरेखाणींच्या रॉयल्टीच्या माध्यमातून शासनाला १२ ते १३ कोटी रुपये, तर वाळू उत्खननातून चार ते पाच कोटी रुपये मिळतात. मात्र, या व्यवसायातील अडचणी लक्षात घेता रॉयल्टी माफीसाठी शासनाकडे आपला पाठपुरावा सुरूच राहील, असे जाधव यांनी स्पष्ट केले.


