(बंगळुरू / वृत्तसंस्था)
पत्नीला नवजीवन मिळावे म्हणून स्वतःची किडनी दान करणाऱ्या पतीवर पुन्हा एकदा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दोन वर्षांपूर्वी पतीने किडनी दान करून जीव वाचवलेल्या ३८ वर्षीय वीणाबाई यांचा गुरुवारी रात्री नेलमंगळाजवळ झालेल्या हिट अँड रन अपघातात मृत्यू झाला. पत्नीच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर तिच्या दीर्घायुष्यासाठी आशीर्वाद घेऊन परतणाऱ्या दाम्पत्याचा प्रवास या अपघातामुळे शोकांतिकेत संपला आहे.
बंगळुरूमधील लग्गेरे येथे राहणारे वीणाबाई आणि त्यांचे पती शिवाजी राव हे तुमकुरू येथील सिद्धगंगा मठात दर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपून दुचाकीवरून घरी परतत असताना नेलमंगळा तालुक्यातील येदेहळळी येथे त्यांच्या दुचाकीला एका मालवाहू वाहनाने जोरदार धडक दिली. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला. या धडकेत वीणाबाई यांचा जागीच मृत्यू झाला.
वीणाबाई यांच्या प्रकृतीला चार ते सहा वर्षांपूर्वी गंभीर समस्या निर्माण झाल्या होत्या. त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याने कुटुंबासमोर मोठे संकट उभे राहिले होते. खासगी कंपनीत नोकरी करणाऱ्या शिवाजी राव यांनी पत्नीला वाचवण्यासाठी दोन वर्षांपूर्वी स्वतःची एक किडनी दान करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या त्यागामुळे वीणाबाई यांना नवजीवन मिळाले होते.
पत्नीच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर तिच्यासोबत आनंदी आयुष्य जगता यावे आणि तिच्या दीर्घायुष्यासाठी आशीर्वाद मिळावेत, या भावनेतून हे दाम्पत्य सिद्धगंगा मठात गेले होते. मात्र, परतीच्या प्रवासात झालेल्या अपघाताने त्यांच्या आयुष्याला वेदनादायी वळण दिले. या घटनेनंतर आपल्या भावना व्यक्त करताना शिवाजी राव म्हणाले, “तिला पुन्हा हसताना आणि आनंदी आयुष्य जगताना पाहण्यासाठी मी माझ्या शरीराचा एक भाग तिला दिला होता, पण नियतीने तिला माझ्यापासून कायमचं हिरावून नेलं.”
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच नेलमंगळा वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वीणाबाई यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी हिट अँड रनचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, अपघातानंतर फरार झालेल्या मालवाहू वाहनचालकाचा शोध सुरू आहे. त्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी पोलिसांकडून केली जात आहे.


