दिव्यांग प्रमाणपत्रांसह आवश्यक कागदपत्रे वारंवार मागणी करूनही सादर न करणाऱ्या शिक्षकांविरोधात सातारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने कठोर भूमिका घेतली आहे. याप्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी नऊ शिक्षकांना निलंबित केले असून, अन्य १३ शिक्षकांना सेवेतून बडतर्फ का करण्यात येऊ नये, याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. संबंधित शिक्षकांना तीन वेळा सूचना देऊनही त्यांनी आवश्यक कागदपत्रे सादर केली नसल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
प्राथमिक शिक्षण विभागाने संबंधित शिक्षकांकडे दिव्यांग प्रमाणपत्रांसह अन्य आनुषंगिक कागदपत्रांची मागणी केली होती. यासाठी तीन वेळा नोटिसा बजावूनही शिक्षकांनी त्याकडे दुर्लक्ष केले. प्रशासनाकडून वारंवार सूचना देण्यात येऊनही आदेशांचे पालन न झाल्याने अखेर मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी निलंबनाचे आदेश दिले.
या कारवाईत राजेश जाधव, विजया जगदाळे, सुनीता मामणे, दीपाली खानविलकर, शुभांगी रणवरे, संतोष यादव, सुनीता गावडे, कविता शिंदे आणि संजीवन जगदाळे या नऊ शिक्षकांचा समावेश आहे.
दरम्यान, छाया भोसले, भगवान काटकर, यशवंत कांबळे, नीता वाघमारे, उदय भंडारे, मनीषा क्षीरसागर, संतोष कदम, सचिन निकाळजे, पूनम गायकवाड, विजय तुपे, बापूराव सोनवलकर, दिगंबर गायकवाड आणि बाबासाहेब केदरी या १३ शिक्षकांच्या दिव्यांग प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यात आली होती. शून्य ते दहा टक्के दिव्यांगत्व दर्शविणाऱ्या प्रमाणपत्रांच्या तपासणीसाठी संबंधित शिक्षकांना जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले होते. तेथे ते अपात्र ठरल्यानंतर पुणे येथील आरोग्य उपसंचालकांकडेही त्यांच्या प्रमाणपत्रांची फेरपडताळणी करण्यात आली. त्यानंतर या १३ शिक्षकांना सेवेतून बडतर्फ करण्याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.


