(नवी दिल्ली / वृत्तसंस्था)
अग्निपथ योजनेअंतर्गत सैन्यदलात भरती झालेल्या अग्निवीरांच्या विवाहासंदर्भात महत्त्वाचा बदल प्रस्तावित करण्यात आला आहे. पहिल्या चार वर्षांच्या सेवाकाळात विवाह करण्यास मनाई असलेल्या अग्निवीरांना आता पुढील दोन वर्षांच्या दुसऱ्या सेवाकाळात विवाहाची परवानगी देण्याचा प्रस्ताव सरकारकडे पाठवण्यात आला आहे. मात्र, ही सवलत मिळवण्यासाठी काही अटींची पूर्तता करावी लागणार आहे. त्यानुसार, दुसऱ्या सेवाकाळात प्रवेश करताना अग्निवीर अविवाहित असणे आणि त्यानंतरचे सुमारे चार आठवड्यांचे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करणे आवश्यक असेल.
अग्निपथ योजनेत सुरुवातीला अग्निवीरांचा सेवाकाळ चार वर्षांचा निश्चित करण्यात आला होता. मात्र, सरकारने त्यात आणखी दोन वर्षांची वाढ करण्याचा निर्णय घेतल्याने एकूण सेवा कालावधी सहा वर्षांचा झाला आहे. या बदलाच्या पार्श्वभूमीवर दुसऱ्या दोन वर्षांच्या सेवाकाळात विवाहाची परवानगी देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. पहिल्या चार वर्षांच्या सेवेदरम्यान मात्र विवाह करण्यास परवानगी नसेल. दुसऱ्या सेवाकाळासाठी अर्ज करतानाही संबंधित अग्निवीर अविवाहित असणे बंधनकारक असेल. या टप्प्यात प्रवेश मिळाल्यानंतर त्यांना सुमारे चार आठवड्यांचे संक्षिप्त प्रशिक्षण पूर्ण करावे लागेल. प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर त्यांना विवाह करता येणार आहे.
केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाने 4 नोव्हेंबर रोजी अग्निवीरांच्या दुसऱ्या दोन वर्षांच्या सेवाकाळाला मंजुरी दिली आहे. प्रशिक्षित सैनिकांचा अनुभव अधिक काळासाठी सैन्यदलाच्या सेवेत वापरता यावा, हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश आहे. याशिवाय, सहा वर्षांचा सेवाकाळ पूर्ण झाल्यानंतर उर्वरित 75 टक्के अग्निवीरांना नियमित भरती प्रक्रियेत सहभागी होण्याची आणखी एक संधी देण्याचाही यामागे उद्देश आहे.
अग्निवीरांची भरती साधारणपणे साडेसतरा ते एकवीस वर्षे वयोगटातील उमेदवारांमधून केली जाते. त्यामुळे सेवाकाळातील पाचव्या वर्षापर्यंत अनेक अग्निवीरांचे वय 23 किंवा 24 वर्षे होते. या वयात विवाह आणि कुटुंबासंदर्भातील निर्णय ग्रामीण भागातील तसेच लहान शहरांमधील तरुणांसाठी महत्त्वाचे ठरतात. ही वैयक्तिक आणि सामाजिक बाब लक्षात घेऊन दुसऱ्या सेवाकाळात विवाहाची मुभा देण्याचा प्रस्ताव पुढे आणण्यात आला आहे.
दरम्यान, संरक्षण प्रमुख जनरल एन. एस. राजा सुब्रमणी यांनी मंत्रिमंडळाच्या मंजुरीच्या वेळी अग्निपथ योजनेत आवश्यकतेनुसार बदल करण्यात येतील, असे स्पष्ट केले होते. प्रशिक्षित सैनिकांच्या अनुभवाचा अधिक काळ उपयोग करून घेण्याबरोबरच अग्निवीरांच्या वैयक्तिक गरजांचाही विचार करणे हा सरकारचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे दुसऱ्या सेवाकाळातील विवाहाच्या परवानगीसंदर्भातील प्रस्ताव आणि त्यातील अटींकडे अग्निवीरांचे लक्ष लागले आहे.


