(रत्नागिरी / प्रतिनिधी)
राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने ५ मार्च २०२६ रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय जारी करत रत्नागिरी येथे उभारण्यात येणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, ५०० खाटांचे अद्ययावत रुग्णालय आणि विविध निवासी इमारतींसाठी ४९३.९७ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे कोकणातील वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य सेवेला मोठी चालना मिळणार आहे.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी उद्योगमंत्री उदय सामंत आणि आमदार किरण सामंत यांनी राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याने कोकणातील विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय शिक्षणाची संधी आता रत्नागिरीतच उपलब्ध होणार आहे. तसेच जिल्ह्यातील आरोग्य सुविधांच्या उन्नतीसाठी हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मानले जात आहे.
प्रकल्पांतर्गत १०० विद्यार्थ्यांची क्षमता असलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, ५०० खाटांचे सुसज्ज रुग्णालय, मुला-मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहे, परिचारिकांसाठी निवासी व्यवस्था तसेच अधिष्ठात्यांसाठी स्वतंत्र निवासस्थान उभारण्यात येणार आहे. एकूण ७७,६७६ चौरस मीटर क्षेत्रावर हे बांधकाम उभारले जाणार असून आधुनिक पायाभूत सुविधांनी सुसज्ज आराखडा तयार करण्यात आला आहे.
या संकुलामध्ये लिफ्ट, वातानुकूलित यंत्रणा, सीसीटीव्ही देखरेख, अग्निशमन व्यवस्था आणि आवश्यक फर्निचर यांसह सर्व आधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. रुग्णसेवा अधिक परिणामकारक व्हावी यासाठी अत्याधुनिक ‘मेडिकल गॅस पाईपलाईन’, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी), अंतर्गत रस्ते व वाहनतळाची सुविधा यांचाही समावेश करण्यात आला आहे. प्रकल्पाची अंमलबजावणी पारदर्शक आणि कार्यक्षम पद्धतीने व्हावी यासाठी केंद्र सरकारच्या सार्वजनिक उपक्रम कंपनीमार्फत ‘टर्न-की’ पद्धतीने हे काम पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच पर्यावरण विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत दिव्यांगांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्याची तरतूदही करण्यात आली आहे.
या मान्यतेमुळे रत्नागिरीसह संपूर्ण कोकण किनारपट्टीवरील आरोग्य व्यवस्थेला बळकटी मिळणार आहे. स्थानिक विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणासाठी मोठ्या शहरांकडे जावे लागणार नाही, तसेच गंभीर आजारांच्या उपचारासाठीही अत्याधुनिक सुविधा जिल्ह्यातच उपलब्ध होणार आहेत. या निर्णयामुळे रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासाला नवी गती मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.

