(रत्नागिरी)
दिनांक १७ जानेवारी २०२६ रोजी स्काई रोबोटिक्स, पुणे यांच्या वतीने आयोजित आंतरशालेय रोबोटिक्स स्पर्धा रत्नागिरी येथील सर्वंकष विद्यामंदिर येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण ३० शाळांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेदरम्यान एकूण ५८ कार्यरत (Running) रोबोटिक्स प्रकल्प सादर करण्यात आले.
या स्पर्धेत एसपीएम, परशुराम शाळेतील इयत्ता ७ वीतील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या AI Voice Control Robot या प्रकल्पाने परीक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेतले. उत्कृष्ट संकल्पना, नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि प्रभावी सादरीकरणाच्या जोरावर या प्रकल्पाला प्रथम क्रमांक प्राप्त झाला.
हा यशस्वी प्रकल्प कुमार विराज अविनाश काळे, शिरीष रोशन खोबरगडे आणि अब्दुल रियाज शेख या विद्यार्थ्यांनी साकार केला होता. या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक, सुवर्णपदक व विजेतेपदाचा चषक देऊन गौरवण्यात आले.
या यशामागे विद्यार्थ्यांचे अथक परिश्रम तसेच एसपीएम शाळेतील AI विषयाच्या शिक्षिका कुमारी काजल विनोद गुप्ता व सौ. प्रेरणा विश्वजीत शिंदे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. याशिवाय हिना शेख, हर्षाली तटकरी आणि पुष्कर जोशी यांचेही महत्त्वपूर्ण सहकार्य विद्यार्थ्यांना मिळाले.
विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या उल्लेखनीय यशाबद्दल शि. प्र. मंडळी शाळा समितीचे अध्यक्ष श्री. राजेंद्र पटवर्धन तसेच संस्थाचालकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. आरती खाडिलकर मॅडम आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनीही विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

