(रत्नागिरी / प्रतिनिधी)
कोकणात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका आता केवळ रस्ते वाहतुकीपुरता मर्यादित राहिलेला नसून, कोकण रेल्वेचे वेळापत्रकही पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. प्रवाशांना वेळेवर सेवा देण्याचा दावा करणारी कोकण रेल्वे गेल्या काही दिवसांपासून अक्षरशः ‘उशिराची रेल्वे’ ठरली असून, सहा ते सात तासांच्या विलंबामुळे हजारो प्रवाशांचा संयम सुटू लागला आहे.
मंगळवारीही परिस्थितीत कोणतीही सुधारणा दिसून आली नाही. मुंबई–मडगाव कोकणकन्या एक्स्प्रेस तब्बल सात तास विलंबाने सावंतवाडी स्थानकात दाखल झाली. दिवा–सावंतवाडी एक्स्प्रेस आणि सीएसएमटी–मडगाव मांडवी एक्स्प्रेस या गाड्यांनाही नियोजित वेळेपेक्षा सुमारे सहा तास उशिराने धावावे लागले. एलटीटी–मडगाव एक्स्प्रेस तीन तास विलंबाने, तर मांडवी एक्स्प्रेस सव्वा तास उशिराने धावत होती. या विलंबाचा परिणाम जनशताब्दी, तुतारी, मांडवी आणि कोकणकन्यासह अनेक गाड्यांच्या फेऱ्यांवर झाला असून, संपूर्ण वेळापत्रकच कोलमडून पडले आहे. स्थानकांवर तासन्तास प्रतीक्षा करणारे प्रवासी अक्षरशः हैराण झाले आहेत. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि रुग्णांना सर्वाधिक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
प्रवाशांच्या मते, मुसळधार पाऊस हा नैसर्गिक घटक असला तरी अशा परिस्थितीतही प्रभावी नियोजन, वेळेवर माहिती आणि पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देणे ही रेल्वे प्रशासनाची जबाबदारी आहे. मात्र, विलंबामागील कारणे स्पष्ट करण्याऐवजी प्रवाशांना केवळ प्रतीक्षेची शिक्षा दिली जात असल्याची तीव्र भावना व्यक्त होत आहे. कोकण रेल्वे मार्गावरील प्रत्येक पावसाळ्यात हीच परिस्थिती निर्माण होत असेल, तर सुरक्षेसोबतच आधुनिक तांत्रिक उपाययोजना, देखभाल आणि आपत्कालीन व्यवस्थापनावर कोट्यवधी रुपयांचा खर्च नेमका कुठे होतो, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. ‘वेळेवर धावणारी रेल्वे’ हा दावा फक्त जाहिरातीपुरताच राहिला आहे का? असा संतप्त सवाल प्रवासी विचारत आहेत.
पावसाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक असले, तरी वारंवार कोलमडणारे वेळापत्रक, अपुरी माहिती आणि प्रवाशांची होणारी गैरसोय यावर कोकण रेल्वे प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना करणे ही काळाची गरज बनली आहे. नाहीतर, प्रत्येक पावसाळ्यात प्रवाशांना विलंब, मनस्ताप आणि अनिश्चिततेचाच प्रवास सहन करावा लागणार, हे वास्तव नाकारता येणार नाही.

