(संगमेश्वर / एजाज पटेल)
अनेक दिवसांपासून असह्य उकाडा आणि दमट वातावरणाने त्रस्त झालेल्या संगमेश्वरात अखेर आज (सोमवारी) दुपारपासून वरुणराजाने दमदार हजेरी लावली. जोरदार पावसाच्या सरींनी उष्णतेने होरपळलेल्या जनजीवनाला मोठा दिलासा मिळाला असून, पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत.
गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले होते. आज दुपारच्या सुमारास अचानक काळ्याभोर ढगांनी आकाश व्यापले आणि काही क्षणांतच मुसळधार पाऊस सुरू झाला. दमदार सरींनी संपूर्ण तालुका चिंब भिजवला. अनेक दिवसांपासून तापलेल्या धरतीला जणू या पावसाने शीतल स्पर्श दिला.
पावसामुळे काही काळ रस्त्यांवर नागरिकांची धावपळ उडाली आणि जनजीवनावर किरकोळ परिणाम झाला. मात्र प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद स्पष्टपणे दिसून येत होता. वातावरणात गारवा निर्माण झाल्याने नागरिकांनीही मोठा दिलासा व्यक्त केला.
पहिल्या दमदार पावसाचा सर्वाधिक आनंद बालगोपाळांनी लुटला. अनेक ठिकाणी मुले पावसात भिजत, खेळत आणि जल्लोष करताना दिसली. उन्हाच्या काहिलीनंतर आलेल्या या सरी अनेकांसाठी निसर्गाने दिलेला सुखद दिलासा ठरल्या.
दरम्यान, शेतकरी वर्गासाठी हा पाऊस विशेष महत्त्वाचा मानला जात आहे. मान्सूनचे आगमन उशिरा झाल्याने पेरणीबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. कृषी विभागाने पेरणी पुढे ढकलण्याचा सल्ला दिला असला तरी, मृग नक्षत्रावर विश्वास ठेवून अनेक शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने पेरणी केली होती. त्यामुळे पावसाअभावी त्यांची चिंता वाढली होती.
सोमवारी झालेल्या दमदार पावसामुळे जमिनीला चांगला ओलावा मिळाला असून, आता शेतीच्या कामांना वेग येण्याची शक्यता आहे. रविवारीही तालुक्यात तुरळक पाऊस झाला होता; मात्र सोमवारी दुपारनंतर कोसळलेल्या सरींनी संपूर्ण वातावरणच बदलून टाकले.
आता आगामी काळातही समाधानकारक पाऊस सुरू राहावा, जेणेकरून खरीप हंगामाला बळ मिळेल, अशी अपेक्षा संगमेश्वर तालुक्यातील शेतकरी आणि नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

