(रत्नागिरी)
रत्नागिरी रेल्वे स्थानकावरील सजावटीच्या छताचा काही भाग पुन्हा कोसळल्याच्या घटनेची सखोल चौकशी करून दोषी ठेकेदार तसेच संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) रत्नागिरी तालुका शाखेच्या वतीने करण्यात आली आहे. तालुका अध्यक्ष रुपेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली मनसे पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
‘अमृत भारत स्टेशन योजना’ अंतर्गत सुमारे ४० कोटी रुपये खर्चून रत्नागिरी रेल्वे स्थानकाचे सुशोभीकरण करण्यात आले. मात्र, उद्घाटनापूर्वी घडलेल्या घटनेनंतर आता पुन्हा एकदा रेल्वे रिक्षा स्टँडकडील सजावटीच्या छताचा मोठा भाग रविवारी (५ जुलै) रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास कोसळल्याने कामाच्या गुणवत्तेवर आणि प्रवाशांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मनसेच्या निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, वर्षभरापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात आलेल्या या सुशोभीकरणाच्या कामात आतापर्यंत दोन वेळा छत कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी कामाचा निकृष्ट दर्जा लक्षात घेता भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संपूर्ण कामाचे तांत्रिक ऑडिट करण्यात यावे, दोषी ठेकेदाराला तात्काळ काळ्या यादीत टाकावे, संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावरही कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मनसेने केली आहे.
यावेळी जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याचे मनसेच्या वतीने सांगण्यात आले. तसेच, प्रशासनाने या प्रकरणात तातडीने कारवाई न केल्यास मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला.
यावेळी तालुका अध्यक्ष रुपेश जाधव यांच्यासह चैतन्य शेंडे, सर्वेश जाधव, तेजस नागवेकर, सुजित घाणेकर आदी मनसे पदाधिकारी उपस्थित होते.

