(राजापूर)
राजापूर तालुक्यातील सौंदळ येथील बांबू संशोधन केंद्राला रत्नागिरी येथील रा. भा. शिर्के प्रशालेच्या ॲड. बाबासाहेब नानल गुरुकुलमधील इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी अभ्यासपूर्ण शैक्षणिक क्षेत्रभेट दिली. या भेटीतून विद्यार्थ्यांना बांबू लागवड, शेतीतील आधुनिक संकल्पना, औषधी वनस्पती तसेच पर्यावरण संवर्धनाविषयी प्रत्यक्ष माहिती मिळाली.
भेटीदरम्यान बांबू संशोधन केंद्राचे व्यवस्थापक वासुदेव घाग यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करून बांबूची लागवड, त्याचे विविध प्रकार, शास्त्रशुद्ध व्यवस्थापन आणि आर्थिक महत्त्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच रेशीम उद्योगासाठी उपयुक्त तुतीची लागवड, फणस लागवड आणि परिसरातील विविध औषधी वनस्पतींची ओळख करून देत त्यांच्या उपयोगांविषयी माहिती दिली. विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारून या विषयांबाबतची उत्सुकता व्यक्त केली.
या क्षेत्रभेटीतून विद्यार्थ्यांना निसर्ग संवर्धन, जैवविविधतेचे महत्त्व आणि शाश्वत शेतीच्या संकल्पना प्रत्यक्ष अनुभवातून समजून घेण्याची संधी मिळाली. अभ्यासक्रमाशी निगडित ज्ञानाबरोबरच पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करण्यास या भेटीची मोलाची मदत झाली.
अभ्यासपूर्ण भेटीनंतर विद्यार्थ्यांनी चुना-कोळवण येथील निसर्गरम्य ‘सवतकडा’ धबधब्याला भेट देत पावसाळी सहलीचा मनमुराद आनंद लुटला. कोसळणाऱ्या धबधब्यात भिजत विद्यार्थ्यांनी वर्षासहलीतील अविस्मरणीय क्षण अनुभवले.
या शैक्षणिक उपक्रमासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक के. डी. कांबळे तसेच गुरुकुल प्रमुख किरण सनगरे यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे अभ्यास, पर्यावरण आणि निसर्ग यांचा सुंदर संगम अनुभवता आल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

