(रत्नागिरी)
रत्नागिरी जिल्हा परिषदेत बनावट दिव्यांग प्रमाणपत्रे आणि इतर भत्त्यांची कागदपत्रे सादर करून शासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी तीन प्राथमिक शिक्षकांना तातडीने निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईमुळे शिक्षण विभागात मोठी खळबळ उडाली असून सध्या ९० शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी सुरू असल्याने काही संशयित शिक्षकांचे धाबे दणाणले आहेत.
महावीर सोमनाथ मिसाळ, उपशिक्षक (मंडणगड), प्रदीप कृष्णा मोरे, उपशिक्षक (रत्नागिरी), राजेश महादू भंडारे (रत्नागिरी) अशी निलंबित केलेल्या शिक्षकांची नावे आहेत.
प्राथमिक चौकशीत निलंबित शिक्षकांनी त्यांच्या प्रत्यक्ष शारीरिक दिव्यांगतेपेक्षा अधिक टक्केवारी दाखवणारी बनावट प्रमाणपत्रे सादर केल्याचे निष्पन्न झाले आहे. शासकीय सवलती मिळवण्यासाठी ही कागदपत्रे वापरून त्यांनी वाहतूक भत्ता तसेच दिव्यांगांसाठी असलेले इतर आर्थिक लाभ नियमबाह्य पद्धतीने घेतल्याचे समोर आले आहे.
जिल्हा परिषद प्रशासनाची कठोर कारवाई
जिल्हा परिषद प्रशासनाने फेर पडताळणीनंतर महावीर मिसाळ, प्रदीप मोरे आणि राजेश भंडारे हे दोषी आढळल्याने त्यांना तात्काळ निलंबित केले. खऱ्या अर्थाने दिव्यांग असलेल्या व्यक्तींच्या हक्कांवर गदा आणणाऱ्या या प्रकारामुळे जिल्हाभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
आणखी कारवाईची शक्यता
प्रशासकीय सूत्रांच्या माहितीनुसार सध्या सुरू असलेल्या तपासणीत बनावट प्रमाणपत्रांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. सरकारी तिजोरीवर डल्ला मारणाऱ्या एकाही दोषीला सोडले जाणार नाही, असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे. उर्वरित ९० शिक्षकांच्या प्रमाणपत्रांच्या सखोल तपासणीत काय निष्पन्न होते, याकडे आता संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

