(पुणे)
पुरोगामी महाराष्ट्रात महिला व मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातल्या भिगवण परिसरात भरदिवसा 21 वर्षीय तरुणीचं अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी घडली. येथील हॉटेल आनंदच्या पाठीमागील भागात दुचाकीवरून जाणाऱ्या आई, मुलगी आणि भावाला अडवून आरोपींनी थेट हल्ला केला आणि आई-भावाच्या डोळ्यांसमोर तरुणीला जबरदस्तीने चारचाकी वाहनात टाकून पळ काढला.
मिळालेल्या माहितीनुसार, तरुणी आपल्या आई व भावासोबत घरी जात असताना संशयित आरोपी चारचाकी वाहनातून तेथे आले. अचानक डोळ्यांत चटणीची पूड टाकून आई व भावाला अडवलं. त्यानंतर लाकडी दांडक्याने मारहाण करत दोघांना जखमी केलं आणि संधी साधून तरुणीचं अपहरण करण्यात आलं. तरुणीच्या आई आणि भावाने आरडाओरडा केला. त्यानंतर स्थानिकांनी या दोघांना मदत केली आणि या घटनेची माहिती पोलिसांना दिली. हा प्रकार इतक्या निर्ढावलेल्या पद्धतीने घडल्याने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.
या प्रकरणी भिगवण पोलीस ठाण्यात जहिर शेख आणि आयान शेख या दोघांविरोधात अपहरण व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची गंभीर दखल घेत बारामती विभागाचे अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी, “अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींच्या शोधासाठी स्वतंत्र पथके रवाना केली आहेत. सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन, कॉल डिटेल्स आणि संभाव्य मार्गांवर नाकाबंदी करून शोधमोहीम सुरू आहे,” अशी माहिती त्यांनी दिली.
विशेष म्हणजे अपहरण करण्यात आलेल्या तरुणीचं अवघ्या पाच दिवसांत लग्न ठरलेलं होतं. आरोपी आणि पीडित तरुणी एकाच वस्तीतील असल्याने अपहरणामागचा नेमका हेतू काय, याचा तपास पोलीस करत आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून विशेष दक्षता घेण्यात येत आहे.
या घटनेनंतर भिगवण शहरात संतापाची लाट उसळली असून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ आज बुधवारी हिंदू राष्ट्र संघटनांकडून भिगवण बंदची हाक देण्यात आली आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या या अपहरणामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

