( मुंबई )
राज्यातील अनेक भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर इयत्ता 11 वी (FYJC) केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या विशेष फेरी-1 चे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार, विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करण्यासाठी उद्या 8 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
शिक्षण संचालनालयाने दिलेल्या माहितीनुसार, शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी राज्यातील 9,688 कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत 14 लाख 73 हजार 420 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून त्यापैकी 10 लाख 8 हजार 94 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे.
उद्या 8 जुलैपर्यंत प्रवेश निश्चित करण्याची संधी
विशेष फेरी-1 मध्ये ज्या विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयाचे वाटप झाले आहे, त्यांनी संबंधित महाविद्यालयात आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून 8 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पोर्टलवरील ‘Proceed for Admission’ या पर्यायाचा वापर करून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन शिक्षण संचालनालयाने केले आहे. सुधारित वेळापत्रकानुसार, 8 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजता पुढील प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. तसेच 10 जुलै 2026 रोजी रिक्त जागांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
विद्यार्थी आणि पालकांना आवाहन
विद्यार्थी, पालक तसेच कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी सुधारित वेळापत्रकाची नोंद घेऊन प्रवेश प्रक्रियेतील सर्व आवश्यक कार्यवाही मुदतीत पूर्ण करावी, असे आवाहन शिक्षण संचालनालयाने केले आहे. प्रवेश प्रक्रियेबाबत अधिक माहिती आणि अद्ययावत वेळापत्रक महाफायजेसी प्रवेशाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे, अशी माहिती शालेय शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) डॉ. महेश पालकर यांनी दिली आहे.

