( मुंबई )
राज्यातील युवकांसाठी कौशल्य प्रशिक्षण, रोजगार, उद्योजकता आणि मार्गदर्शन एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देणारा ‘महाचतुर एआय चॅटबॉट’ हा महाराष्ट्रासाठी परिवर्तनकारी उपक्रम ठरणार आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या पुढाकारातून विकसित करण्यात आलेला हा चॅटबॉट देशातील राज्य शासनाने सादर केलेला अशा प्रकारचा पहिलाच अभिनव उपक्रम असल्याचे सांगण्यात आले. या उपक्रमामुळे शिक्षणापासून रोजगारापर्यंतचा प्रवास अधिक सुकर होईल आणि उद्योगांना कुशल मनुष्यबळ त्वरित उपलब्ध होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
सह्याद्री अतिथीगृहात लोकार्पण
मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे ‘महाचतुर एआय चॅटबॉट’चे लोकार्पण आणि सामंजस्य करार सोहळा पार पडला. यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा, अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा, राज्य नाविन्यता सोसायटीचे आयुक्त डॉ. अमित सैनी, व्यवसाय व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक सतीश सूर्यवंशी यांच्यासह जपान, जर्मनी, कोरिया आणि फिनलंडचे वाणिज्यदूत तसेच उद्योग व शैक्षणिक क्षेत्रातील प्रतिनिधी उपस्थित होते.
‘महाचतुर’ कसा करणार मदत?
‘महाचतुर एआय चॅटबॉट’ हा युवकांसाठी वन-स्टॉप सोल्युशन म्हणून काम करणार आहे. याच्या माध्यमातून खालील सेवा उपलब्ध होणार आहेत:
- कौशल्य प्रशिक्षणाची माहिती
- रोजगार संधी व नोकरी मार्गदर्शन
- उद्योजकता सल्ला व मार्गदर्शन
- अर्ज प्रक्रिया व असेसमेंट
- उद्योगांशी थेट संपर्क (मार्केट लिंकेज)
यामुळे तरुणांना वेगवेगळ्या ठिकाणी भटकण्याची गरज भासणार नाही.
युवकशक्ती म्हणजे देशाची ताकद
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भारतातील सुमारे 65 टक्के लोकसंख्या 35 वर्षांखालील आहे, ही देशासाठी मोठी संधी आहे. या युवा शक्तीला योग्य कौशल्य प्रशिक्षण देऊन अर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात कौशल्य विकास विभाग उद्योगांच्या गरजांनुसार प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्यावर भर देत आहे. उद्योगांना कुशल कामगार हवे आहेत आणि तरुणांना रोजगार—या दोघांमध्ये प्रभावी दुवा निर्माण करण्याचे काम ‘महाचतुर’ करणार आहे.
असंघटित क्षेत्रालाही मिळणार बळ
मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले की, राज्यातील असंघटित कौशल्य क्षेत्राला एकत्र आणून एक सक्षम व्यासपीठ उभारण्याचा प्रयत्न सुरू आहे. राज्यात हजारो संस्था कौशल्य विकासासाठी काम करत आहेत. या सर्वांना एकत्र आणून कौशल्य चळवळ अधिक व्यापक करण्याचा विभागाचा संकल्प आहे.
AI मुळे बदलणारी रोजगाराची दुनिया
कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) मुळे काही पारंपरिक नोकऱ्यांवर परिणाम होण्याची शक्यता असली, तरी त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर नव्या रोजगार संधी निर्माण होणार आहेत. या बदलत्या परिस्थितीत युवकांना योग्य कौशल्य देऊन जागतिक रोजगार बाजारपेठेशी जोडण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असल्याचे मंगलप्रभात लोढा यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्रासाठी नवा डिजिटल टप्पा
‘महाचतुर एआय चॅटबॉट’ हा केवळ तंत्रज्ञान प्रकल्प नसून, तो युवकांच्या करिअर घडवणारा आणि उद्योगांना गती देणारा महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. या उपक्रमामुळे राज्यातील लाखो युवकांना रोजगार, कौशल्य आणि उद्योजकतेच्या नव्या संधी उपलब्ध होणार असून, महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीला नवे बळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

