(रत्नागिरी / वार्ताहर)
जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि जोरदार वादळी वाऱ्यामुळे रत्नागिरी रेल्वे स्थानकात मोठी दुर्घटना घडली. ५ जुलै रोजी रात्री सुमारे १०.४५ वाजण्याच्या सुमारास स्थानकाचे नूतनीकरण केलेले छत अचानक कोसळले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, जोरदार वाऱ्याचा वेग वाढल्याने स्थानकाच्या नव्याने बसवलेल्या छताच्या काही भागात अचानक ढासळण झाली. या वेळी रिक्षा स्टँडजवळ काही प्रवासी आणि नागरिक पावसापासून बचावासाठी थांबले होते. छत कोसळण्याचे संकेत मिळताच त्यांनी तत्काळ सुरक्षित ठिकाणी धाव घेतली, त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
घटनेनंतर स्थानक परिसरात काही वेळ भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. रिक्षा स्टँडकडील भागात वीजपुरवठा आणि प्रकाश व्यवस्था प्रभावित झाल्याने काही काळ अंधार पसरला होता. मात्र रेल्वे प्रशासनाने तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न केले.
ही घटना रात्रीच्या वेळी घडल्यामुळे प्रवाशांची गर्दी तुलनेने कमी होती. मात्र दिवसाच्या वेळी ही दुर्घटना घडली असती तर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची वर्दळ लक्षात घेता गंभीर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, नूतनीकरण केलेल्या छताची गुणवत्ता आणि बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. मुसळधार पाऊस आणि वाऱ्याच्या पार्श्वभूमीवर स्थानकाच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

