(संगमेश्वर / प्रतिनिधी)
तालुक्यातील लोवले गावातील तरुण शेतकरी शुभम दोरकडे यांनी बिगर हंगामी कलिंगडाची आंतरपीक पद्धती स्वीकारत पारंपारिक शेतीला आधुनिकतेची जोड दिली असून, केवळ ५२ दिवसांत लाखोंचा नफा कमावत क्षेत्रात आदर्श निर्माण केला आहे. प्रयोगशील शेतीकडे वळणाऱ्या नवतरूणांसाठी शुभम यांची ही वाटचाल प्रेरणादायी ठरत आहे.
दापोली कृषी विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर शुभम यांनी ‘पारंपारिक चौकटीबाहेर जाऊन काहीतरी वेगळं करायचं’ या ध्येयाने शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला. सप्टेंबर महिन्यात त्यांनी बागेच्या दोन ओळींमध्ये विशेष बेड तयार करून ‘विजय’ वाणाची कलिंगड लागवड केली. साधारण जूनअखेर संपणाऱ्या कलिंगड हंगामाच्या बाहेर हा मोठा प्रयोग करताना वातावरण, कीड-रोग व्यवस्थापन आणि बाजारपेठेतील चढ-उतार ही तीनही आव्हानं त्यांच्या समोर होती. मात्र योग्य नियोजनाने त्यांनी ही जोखीम संधीमध्ये बदलली.
लागवडीच्या टप्प्यात ह्युमिक ॲसिड, 19:19:19, बुरशीनाशक-कीटकनाशकांचा संतुलित वापर, तर बेसल डोसमध्ये स्मार्ट मिल, सेंद्रिय खत, 10:26:26, सूक्ष्म अन्नद्रव्ये, पोटॅशियम शोनाइट, कॅल्शियम, मॅग्नेशियम, बोरॉन यांचा ठिबक सिंचनातून पुरवठा—यामुळे कलिंगडाची वाढ मजबूत, समतोल व रोगमुक्त राहिली. चार-पाच दिवसांच्या अंतराने काटेकोर फवारणी व्यवस्थापन करत पिकावर नियंत्रण ठेवण्यात आले. बिगर हंगामी पिकासाठी पुणे आणि वाशी बाजारपेठांचा अभ्यास करून शुभम यांनी आगाऊ नियोजन केले. व्यापाऱ्यांशी प्रत्यक्ष संपर्क साधून दरांची रणनीती आखली. परिणामी, त्यांच्या शेतातूनच प्रतिकिलो २० रुपये दराने थेट विक्री सुरू झाली. लागवडीनंतर अवघ्या ५२ दिवसांत तोडणीला सुरुवात झाली असून तब्बल १० टन उत्पादन अपेक्षित आहे.
या पिकातून सुमारे दोन लाख रुपयांचे एकूण उत्पन्न मिळणार असून खर्च वजा करता तब्बल १ लाख ४० हजार रुपयांचा निव्वळ नफा शुभम यांच्या हाती पडणार आहे. योग्य शिक्षण, नवतंत्रज्ञानाचा अभ्यास, प्रयोगशील वृत्ती आणि बाजारपेठेची अचूक समज—या चौघांच्या संगमातून एक तरुण शेतकरी हंगामाबाहेरही यशस्वी कलिंगड उत्पादन करून दाखवू शकतो, याचे हे प्रभावी उदाहरण आहे. लोवलेच्या मातीत उगवलेली ही यशोगाथा आज अनेक तरुणांसाठी प्रेरणेचा नवा अंकुर ठरत आहे.

