(संगमेश्वर / मकरंद सुर्वे)
कल्याण येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत संगमेश्वर तालुक्यातील गोळवली गावचे सुपुत्र आणि सावर्डे आयटीआय कॉलेजचे प्राध्यापक सुरेंद्र हातखंबकर यांनी उल्लेखनीय कामगिरी करत ‘महाराष्ट्र श्रीमान’ स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला. या यशामुळे त्यांची रत्नागिरी येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
शरीरसौष्ठवाची विशेष आवड असलेल्या हातखंबकर यांनी सातत्यपूर्ण व्यायाम, योगाभ्यास आणि शिस्तबद्ध आहार यावर भर देत स्वतःला सिद्ध केले आहे. योग्य आहार पद्धती आणि वेळेचे काटेकोर पालन यामुळे त्यांनी या क्षेत्रात भक्कम स्थान निर्माण केले आहे. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर विविध स्पर्धांमध्ये सहभागी होत त्यांनी यापूर्वीही अनेक यश संपादन केले आहे.
त्यांच्या या यशाबद्दल गोळवली, धामणी तसेच पंचक्रशीतील संगम गणेश मंडळाचे सदस्य, हितचिंतक आणि मित्रपरिवाराकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

