(संगमेश्वर)
संगमेश्वर तालुक्यातील किरदाडी गावचे सुपूत्र आणि देवरूखमधील नामांकित रेडियम आर्टिस्ट नितीन ऊर्फ पिंट्या पेडणेकर यांचे आज (शनिवार) पहाटे मुंबई येथे उपचारादरम्यान दुःखद निधन झाले.
पिंट्या पेडणेकर हे शांत, प्रेमळ आणि सर्वांना आपलेसे करणाऱ्या स्वभावाचे म्हणून देवरूख परिसरात ओळखले जात. देवरूखच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्यांचे रेडियमचे दुकान अनेक वर्षे चालू असून वाहनांवरील आकर्षक रेडियम लेटरिंगमध्ये त्यांचा हातखंडा होता. जुन्या, विश्वासू आणि कुशल व्यावसायिकांमध्ये त्यांची गणना केली जात असे.
बहुगुणी आणि हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व अशी त्यांची ओळख होती. काही वर्षांपूर्वी ते मनसेचे विभागाध्यक्ष म्हणूनही कार्यरत होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती आणि त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.
निधनाची बातमी कळताच देवरूख परिसरात शोककळा पसरली असून अनेकांनी सामाजिक माध्यमांवर आणि प्रत्यक्ष भेटूनही त्यांच्याविषयीची हळहळ व्यक्त केली आहे. एक हरहुन्नरी, मनमिळावू व्यक्तीमत्व कायमचे हरपल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.
त्यांची अंत्ययात्रा आज सायंकाळी किरदाडी येथील राहत्या घरातून निघणार आहे. त्यांच्या अकाली निधनाने पेडणेकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

