(राजापूर / तुषार पाचलकर)
राजापूर तालुक्यात प्रस्तावित अप्पर तहसील कार्यालयाच्या मुख्यालयासाठी पाचलची होत असलेली मागणी ही केवळ भावनिक नाही, तर सक्षम बाजारपेठ, विकसित पायाभूत सुविधा आणि पंचक्रोशीतील नागरिकांच्या अनेक वर्षांच्या विश्वासावर आधारित असल्याचा दावा व्यापारी वर्गाने केला आहे. त्यामुळे कार्यालयाच्या स्थानाबाबत निर्णय घेताना वस्तुस्थिती आणि जनहिताला प्राधान्य द्यावे, अशी मागणी जोर धरत आहे.
राजापूर तालुक्याच्या पूर्व भागातील प्रमुख व्यापारी केंद्र म्हणून ओळख असलेल्या पाचलने गेल्या अनेक दशकांत सातत्याने विकास साधला आहे. आज पंचक्रोशीतील हजारो नागरिक शेती, व्यापार, शिक्षण, आरोग्य, बँकिंग, शासकीय कामे आणि दैनंदिन गरजांसाठी पाचलवर अवलंबून आहेत. त्यामुळे पाचल ही केवळ बाजारपेठ नसून संपूर्ण पूर्व भागाच्या अर्थकारणाचा आणि दैनंदिन व्यवहारांचा केंद्रबिंदू बनली आहे.
सध्या पाचलमध्ये २८० हून अधिक व्यावसायिक आणि सेवा आस्थापना कार्यरत आहेत. हॉटेल्स, रुग्णालये, दवाखाने, मेडिकल स्टोअर्स, राष्ट्रीयीकृत व सहकारी बँका, एटीएम, सेतू सुविधा केंद्रे, प्रयोगशाळा, हार्डवेअर, इलेक्ट्रिकल, मोबाईल दुकाने, वाहन दुरुस्ती केंद्रे, फर्निचर, सराफा, शेती अवजारे दुरुस्ती केंद्रे, गॅरेज, लॉज आणि इतर असंख्य व्यवसायांमुळे नागरिकांच्या जवळपास सर्व गरजा एकाच ठिकाणी पूर्ण होत आहेत.
विशेष म्हणजे, पाचल बाजारपेठेने अनेक दशकांपासून विविध भागांतून आलेल्या व्यापाऱ्यांना समान संधी दिली आहे. अनेक व्यापारी येथे स्थायिक झाले असून त्यांनी स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे पाचलची ओळख ही केवळ व्यापारी केंद्र म्हणून नसून विश्वास, सर्वसमावेशकता आणि विकासाची परंपरा जपणारी बाजारपेठ अशी निर्माण झाली आहे.
व्यापारी वर्गाच्या मते, अप्पर तहसील कार्यालय पाचलमध्ये सुरू झाल्यास महसूल विभागाशी संबंधित कामांसाठी नागरिकांची धावपळ कमी होईल, आधीपासून उपलब्ध असलेल्या सुविधा अधिक प्रभावीपणे वापरता येतील, स्थानिक व्यापाराला चालना मिळेल, नवीन व्यावसायिक संधी निर्माण होतील आणि रोजगारालाही गती मिळेल.
“ज्या ठिकाणी सर्व सुविधा, मजबूत व्यापारी व्यवस्था, आर्थिक व्यवहारांचे केंद्र आणि नागरिकांचा सातत्याने मोठा ओघ आहे, त्या ठिकाणीच प्रशासकीय कार्यालय उभारणे हे जनहिताचे ठरते,” असे मत व्यापारी वर्गाने व्यक्त केले आहे.
त्यामुळे अप्पर तहसील कार्यालयाच्या मुख्यालयाचा निर्णय घेताना केवळ पर्यायी ठिकाणांचा विचार न करता पाचलमधील विद्यमान सुविधा, व्यापारी क्षमता, नागरिकांची सोय आणि संपूर्ण पंचक्रोशीच्या दीर्घकालीन हिताचा वस्तुनिष्ठ विचार करावा, अशी मागणी व्यापारी वर्गाकडून करण्यात येत आहे.

