(राजापूर / तुषार पाचलकर)
राजापूर तालुका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जितेंद्र खामकर यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्याने तालुक्याच्या राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नरुद्दीन सय्यद यांना पाठविलेल्या आपल्या राजीनामा पत्रात जितेंद्र खामकर यांनी वैयक्तिक कारणास्तव पक्ष सदस्यत्व आणि तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याचे नमूद केले आहे.
राजापूर तालुक्यात काँग्रेसची स्थिती फारच बिकट होती. मधल्या काळात पक्षाचा कार्यकर्ता म्हणून जितेंद्र खामकर यांनी पक्ष संघटन वाढीसाठी मोठे काम केले होते.त्याची दखल घेऊन त्यांची काँग्रेसचे तालुकाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली होती. नुकत्याच झालेल्या राजापूर नगर परिषदेच्या निवडणुकीत महाविकास म्हणून काँग्रेस शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, मनसे, यांच्या समवेत एकत्रित लढली होती. महाविकास आघाडी मधून काँग्रेसला चांगले यश मिळाले होते. लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासह एकूण सात नगरसेवक काँग्रेसचे तर तीन सदस्यउद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे निवडून आले होते. परिषदेत सत्ता देखील महाविकास आघाडीची आली होती. त्यामुळे आघाडीत उत्साहाचे वातावरण होते. मात्र जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक कार्यक्रमाला सुरवात होत असतानाच काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जितेंद्र खामकर यांनी आपल्या सदस्य आणि तालुकाध्यक्ष पदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे.
पक्षाचे जिल्हाध्यक्ष नरुद्दीन सय्यद यांना पाठविलेल्या पत्रात त्यांनी वैयक्तिक कारणासाठी राजीनामा दिल्याचे नमूद केले आहे.पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी दिलेली संधी आणि नगराध्यक्षा ऍड हुस्नबानू खलिफे यांचे वेळोवेळी लाभलेले मोलाचे मार्गदर्शन याबद्दल त्यांनी धन्यवाद व्यक्त केले आहेत.राजापूर तालुक्यातील जेष्ठ पक्ष सदस्य, कार्यकारिणी सदस्य, पदाधिकारी यांनी दिलेली साथ याबद्दल त्यांनी सर्वांना धन्यवाद दिले आहेत.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूकिची रणधुमाळी सुरु झाली असतानाच काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष जितेंद्र खामकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने काँग्रेससह महाविकास आघाडीला दणका मिळाला आहे.

