(रत्नागिरी)
रत्नागिरीकरांसह राज्यातील पर्यटनप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथे उभारण्यात येणाऱ्या जागतिक दर्जाच्या ‘मालगुंड प्राणी संग्रहालय’ प्रकल्पाला अखेर गती मिळाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी 115 कोटी 42 लाख 87 हजार 155 रुपयांची ई-निविदा प्रसिद्ध केली असून, यामुळे कोकणातील पर्यटनाला नवे वैभव प्राप्त होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
उत्तर रत्नागिरी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रकल्पात 101 कोटी 53 लाख 13 हजार 675 रुपयांची नागरी बांधकामे आणि 13 कोटी 29 लाख 78 हजार 448 रुपयांची विद्युत कामे करण्यात येणार आहेत. याशिवाय रॉयल्टी व चाचणीसाठी 59 लाख 95 हजार 32 रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
या कामासाठी इच्छुक कंत्राटदारांना 57 लाख 72 हजार रुपयांची इसारा रक्कम जमा करावी लागणार असून, 1 कोटी 15 लाख 43 हजार रुपयांची परफॉर्मन्स सिक्युरिटी निश्चित करण्यात आली आहे. कार्यारंभ आदेश मिळाल्यानंतर 24 महिन्यांत हा प्रकल्प पूर्ण करणे बंधनकारक असेल.
टनेल अॅक्वेरियम ठरणार मुख्य आकर्षण
या प्राणी संग्रहालयाचे प्रमुख आकर्षण म्हणजे अत्याधुनिक टनेल अॅक्वेरियम. यामध्ये ‘सी वॉटर मरीन कम्युनिटी टनेल अॅक्वेरियम’ आणि ‘फ्रेशवॉटर मॉन्स्टर टनेल अॅक्वेरियम’ उभारण्यात येणार आहेत. याशिवाय संपूर्ण परिसरात 34 मोटराईज्ड गेट ऑपरेटिंग सिस्टीम बसवण्यात येणार असून सुरक्षा आणि व्यवस्थापनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे.
बांधकामासाठी 2,608 घनमीटर आरसीसी काँक्रीट, 251.75 मेट्रिक टन टीएमटी/एचसीआरएम स्टील आणि 216 मेट्रिक टन स्ट्रक्चरल स्टील वापरले जाणार आहे. विद्युत कामांमध्ये 368 पॉइंट वायरिंग, 3,050 मीटर एचटी अॅल्युमिनियम केबल, 525 मीटर एचटी कंडक्टर, 62.5 केव्हीए डीजी सेट आणि 100 केव्हीए ट्रान्सफॉर्मर बसवण्यात येणार आहे.
24 जुलैपर्यंत निविदा प्रक्रिया
कंत्राटदारांना 2 जुलै ते 24 जुलै 2026 या कालावधीत महाटेंडर्स संकेतस्थळावरून निविदा डाउनलोड व अपलोड करता येणार आहेत. 9 जुलै रोजी मुंबई येथे प्री-बिड बैठक होणार असून, 27 जुलै रोजी तांत्रिक आणि आर्थिक निविदा उघडण्यात येतील. निविदा शुल्क 5,900 रुपये निश्चित करण्यात आले आहे.
पर्यटकांना पाहायला मिळणार विविध वन्यजीव
या संग्रहालयात पर्यटकांसाठी विविध वन्य प्राणी, पक्षी आणि सरपटणाऱ्या प्राण्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे. वाघ, बिबट्या, अस्वल, लांडगा यांसारख्या हिंस्र प्राण्यांसाठी आंतरराष्ट्रीय निकषांनुसार नैसर्गिक अधिवास विकसित केला जाणार आहे. तसेच नीलगाय, काळवीट, चितळ, सांबर आदी शाकाहारी प्राण्यांसाठी विस्तीर्ण मोकळे अधिवास तयार करण्यात येतील. याशिवाय आधुनिक रेप्टाईल हाऊस आणि दुर्मिळ तसेच रंगीबेरंगी पक्ष्यांसाठी भव्य एव्हिएरी उभारण्यात येणार आहे. त्यामुळे पर्यटकांना कोकणातच समृद्ध वन्यजीव आणि सागरी जीवसृष्टीचा अनोखा अनुभव घेता येणार आहे.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे मालगुंड परिसरातील पर्यटनाला मोठी चालना मिळण्याबरोबरच स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

