(दापोली)
“देशाचं भवितव्य सक्षम कन्या आणि सक्षम नारीवर अवलंबून आहे. स्त्री हा घराचा पाया असून तिचं आरोग्य चांगलं राहणं अत्यावश्यक आहे,” असे प्रतिपादन प्राथमिक आरोग्य केंद्र साखळोलीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल सानप यांनी केले.
साखळोली नं.१ येथे आयोजित आरोग्य शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. गावच्या सरपंच श्रीमती दिक्षा तांबे यांनी “महिलांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे, तसेच मुलांना योग्य शिक्षण, संस्कार आणि सकस आहार मिळवून दिला पाहिजे,” असा सल्ला दिला.
या शिबिरात महिला, पुरुष आणि शालेय मुलांची आरोग्य तपासणी, मोफत औषधोपचार, असंसर्गजन्य आजार तपासणी, रक्तदाब, मधुमेह, कॅन्सर, क्षयरोग तपासणी तसेच गर्भवती मातांची तपासणी घेण्यात आली. किशोरवयीन मुलींसाठी स्वतंत्र आरोग्य तपासणीही करण्यात आली. या शिबिराचा ८७ नागरिकांनी लाभ घेतला.
यावेळी सरपंच दिक्षा तांबे, उपसरपंच दिनेश जाधव, तंटामुक्ती समिती अध्यक्ष शांताराम शिंदे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा वेभवी गोरीवले, मुख्याध्यापक संजय मेहता, पोलीस पाटील सुनिल गौरत, ग्रामपंचायत सदस्य रामकृष्ण बर्बे आदी मान्यवर उपस्थित होते.
शिबीर यशस्वी करण्यासाठी समुदाय आरोग्य अधिकारी शशिकांत कदम, किरण आंधळे, निखिल शेळके, आरोग्य सहाय्यक रमेश उमते, पंचक्रोशीतील अंगणवाडी सेविका, आशा कर्मचारी तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र साखळोली येथील सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
सुत्रसंचालन गोकुळ ढाकणे यांनी केले तर आभार शशिकांत कदम यांनी मानले.

