(रत्नागिरी / प्रतिनिधी)
कोकणातील पारंपरिक शिमगोत्सवाची धामधूम जिल्ह्यात रंगू लागली असून, मुंबईसह परराज्यातील चाकरमानी मोठ्या संख्येने गावी दाखल होत आहेत. या पार्श्वभूमीवर २ मार्च रोजी जिल्ह्यातील १८ पोलिस स्थानकांच्या हद्दीत एकूण ३,७८६ ‘होम’ पेटविले जाणार आहेत. यामध्ये १,२९४ सार्वजनिक आणि २,४९२ खासगी होमांचा समावेश आहे.
रत्नागिरी शहर पोलिस स्थानक हद्दीत ११ सार्वजनिक व १०५ खासगी होम पेटणार असून, ग्रामीण भागात ७८ सार्वजनिक आणि १३३ खासगी होमांची नोंद आहे. पूर्णगड येथे ३० सार्वजनिक व ६५ खासगी, तर संगमेश्वर परिसरात ९९ सार्वजनिक आणि १६८ खासगी होम पेटविले जाणार आहेत. जयगड येथे ४५ सार्वजनिक व १६६ खासगी, दाभोळ परिसरात २४ सार्वजनिक व ८५ खासगी होमांचा समावेश आहे.
खेड तालुक्यात १५० सार्वजनिक व १६० खासगी होम पेटणार असून, मंडणगड येथे ७५ सार्वजनिक व १५० खासगी होमांची तयारी पूर्ण झाली आहे. दापोली तालुक्यात सर्वाधिक १५० सार्वजनिक आणि तब्बल ४५० खासगी होम पेटणार आहेत. मंडणगड तालुक्यातील बाणकोट येथे ३३ सार्वजनिक, तर सावर्डे येथे ४३ सार्वजनिक व ११० खासगी होमांची नोंद आहे.
चिपळूण येथे ९७ सार्वजनिक व १७७ खासगी, अलोरे-शिरगाव येथे ३३ सार्वजनिक व ८९ खासगी, गुहागर येथे ७८ सार्वजनिक व २३० खासगी होम पेटविले जाणार आहेत. लांजा येथे ९६ सार्वजनिक व ११४ खासगी, नाटे येथे ३० सार्वजनिक व ४० खासगी, देवरुख येथे ११८ सार्वजनिक व १०८ खासगी, तर राजापूर तालुक्यात १०४ सार्वजनिक व १४२ खासगी होम पेटणार आहेत. शिमगोत्सवाच्या निमित्ताने जिल्हाभरात उत्साहाचे वातावरण असून, पारंपरिक श्रद्धा आणि सामाजिक एकात्मतेचे प्रतीक असलेल्या या उत्सवासाठी प्रशासन आणि पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे.

