(रत्नागिरी / वार्ताहर)
अचानक श्वास घेण्यास त्रास होण्यासोबतच नाकातून रक्तस्राव सुरू झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या २४ वर्षीय तरुणाचा उपचार सुरू होण्यापूर्वीच मृत्यू झाल्याची घटना रत्नागिरी शहरात घडली. चैतन्य दिनेश साळवी (वय २४, रा. कसोप, ता. जि. रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव आहे.
ही घटना २४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी घडली. सकाळी सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास चैतन्य याला अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्याचवेळी त्याच्या नाकातून रक्तस्राव सुरू झाल्याने कुटुंबीयांनी तातडीने मदत घेतली. त्यानंतर १०८ रुग्णवाहिकेच्या मदतीने चैतन्य याला रत्नागिरी येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.
मात्र, रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता चैतन्य याचा उपचार सुरू करण्यापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले. या घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.
याप्रकरणी २४ ऑगस्ट रोजी दुपारी ३.१५ वाजता आकस्मिक मृत्यू क्रमांक १०३/२०२६ अन्वये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस) कलम १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. तरुणाच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, पोलिसांकडून नोंदीनुसार पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.
अचानक प्रकृती बिघडल्यानंतर अवघ्या काही वेळातच २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याने साळवी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

