(मुंबई)
कोकण रेल्वेच्या बेलापूर येथील कॉर्पोरेट कार्यालयात अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. संतोष कुमार झा यांच्या अध्यक्षतेखाली सुरक्षा चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. सुरक्षित आणि कार्यक्षम रेल्वे संचालन सुनिश्चित करण्यासाठी घेतलेल्या या चर्चासत्रात सुरक्षा जागरूकतेवर भर देण्यात आला.
या चर्चासत्रात सतर्कता, वेळेवर घटनांची माहिती देणे आणि सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन या बाबींवर सखोल चर्चा झाली. संचालनातील सुरक्षिततेचा पाया मजबूत ठेवण्यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्याने दक्ष आणि सजग राहण्याचे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमात कार्यस्थळी सतर्क राहून त्वरित उपाययोजना करणाऱ्या १२ कर्मचाऱ्यांना विशेष सन्मानित करण्यात आले. त्यांना प्रमाणपत्रांसह रोख पारितोषिक देण्यात आले. हे कर्मचारी त्यांच्या कार्यप्रणालीद्वारे इतरांसाठी प्रेरणास्थान ठरल्याचे व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.
१२ चर्चासत्रांची मालिका; तीन विभागीय केंद्रांवर आयोजन
या चर्चासत्राच्या माध्यमातून कोकण रेल्वेने एक व्यापक सुरक्षा जागरूकता मोहीम सुरू केली असून, ही मालिका एकूण १२ चर्चासत्रांची आहे. बेलापूर, रत्नागिरी आणि कारवार येथे प्रत्येकी चार चर्चासत्रांचे आयोजन केले जाणार असून, सर्व स्तरांवर सुरक्षिततेची संस्कृती अधिक बळकट करण्याचा यामागील उद्देश आहे.
अधिकाऱ्यांची उपस्थिती आणि मार्गदर्शन
कार्यक्रमास कोकण रेल्वेचे डायरेक्टर ऑपरेटिंग सुनील गुप्ता, डायरेक्टर वर्क्स आर. के. हेगडे यांच्यासह विविध वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते. अध्यक्ष संतोष कुमार झा यांनी कर्मचार्यांशी थेट संवाद साधत, त्यांच्या भूमिकेचे कौतुक केले आणि भविष्यातही अशा जागरूकतेच्या कार्यक्रमांना प्रोत्साहन देण्याची ग्वाही दिली.