(रत्नागिरी /प्रतिनिधी)
छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या आणि कोकणाच्या सागरी वैभवाचे प्रतीक असलेल्या गोपाळगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी रत्नागिरी पोलीस दलाने पुढाकार घेत मंगळवारी विशेष स्वच्छता मोहीम राबविली. या उपक्रमात पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी किल्ला परिसरातील कचरा, झुडपे आणि अस्वच्छता दूर करून ऐतिहासिक वास्तूच्या जतनाचा संदेश दिला.
पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या मोहिमेला विशेष महत्त्व प्राप्त झाले. कारण केवळ आदेश देण्यापुरते मर्यादित न राहता पोलीस अधीक्षक बगाटे स्वतः किल्ला परिसरात उपस्थित राहिले आणि स्वच्छता मोहिमेत प्रत्यक्ष सहभाग घेतला. हातात स्वच्छतेची साधने घेऊन त्यांनी परिसराची साफसफाई करत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसमोर आदर्श निर्माण केला. अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर उभा असलेला गोपाळगड किल्ला हा ऐतिहासिक सागरी किल्ला मराठा इतिहासातील महत्त्वाचा वारसा मानला जातो. या वारशाचे संरक्षण आणि संवर्धन करणे ही केवळ प्रशासनाची नव्हे, तर समाजाचीही सामूहिक जबाबदारी असल्याचा संदेश या मोहिमेतून देण्यात आला.
स्वच्छता अभियानादरम्यान किल्ला परिसरातील प्लास्टिक, कचरा आणि वाढलेली झुडपे हटविण्यात आली. पर्यटकांनी ऐतिहासिक स्थळांची स्वच्छता राखावी, तसेच वारसा स्थळांचे जतन करण्यासाठी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. दरम्यान, किल्ल्याच्या सद्यस्थितीबाबत उपस्थित होणाऱ्या विविध प्रश्नांच्या संदर्भात शासन स्तरावर आवश्यक कार्यवाही सुरू असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. संबंधित सर्व बाबींची दखल घेण्यात आली असून नागरिकांनी कोणत्याही अफवा, अपप्रचार किंवा दिशाभूल करणाऱ्या संदेशांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.
कोणतीही संशयास्पद बाब, तक्रार अथवा माहिती असल्यास नागरिकांनी तात्काळ डायल ११२, रत्नसेतू चॅटबॉट किंवा जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे. .इतिहासाचे जतन आणि सामाजिक जबाबदारी यांचा संगम घडवून आणणाऱ्या या उपक्रमामुळे गोपाळगड परिसरात स्वच्छतेबाबत जनजागृती झाली असून, ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी प्रशासन आणि नागरिकांनी एकत्रितपणे पुढाकार घेण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.

