(जाकादेवी / वार्ताहर)
आपल्या सामर्थ्यानिशी प्रयत्न केल्यानंतर नक्कीच पुढे जाऊ शकतो, प्रयत्नांची पराकाष्ठा करा, भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रत्येक व्यक्तीला सामर्थ्यशाली होण्यासाठी संविधानात पूर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार प्रत्येकाने जिद्दीने आणि मेहनतीने जीवनातील ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्न केल्यास, नक्कीच यश मिळवू शकते, असे प्रतिपादन सत्कारमूर्ती जिल्हा न्यायाधीश सुरज सदानंद मोरे यांनी जाकादेवी येथील सत्कार समारंभात बोलताना केले.
रत्नागिरीचे जिल्हान्यायाधीश म्हणून नियुक्ती झाल्याने न्यायाधीश सुरज मोरे यांचा जाकादेवी विभागाच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला जाकादेवी येथे जिल्हा न्यायाधीश श्री सुरज मोरे यांचा नियोजनाप्रमाणे अतिशय उत्साहात सत्कार समारंभ संपन्न झाला. सत्कार समारंभाला रत्नागिरी जिल्हा सरोदे समाजाचे जिल्हाध्यक्ष श्री सुरेंद्र रणसे, सरोदे समाज संघटक श्री. राजेश आयरे, सरोदे समाज तरवळ जाकादेवी विकास मंडळाचे अध्यक्ष श्री गुरुदेव शिवगण, भाजपा रत्नागिरी तालुका युवा अध्यक्ष श्री. प्रतीक देसाई, राष्ट्रपती पदकाचे मानकरी माजी इन्स्पेक्टर श्री. प्रभाकर भागवत, श्री मिलिंद देसाई यांच्या सहित अनेक मान्यवर उपस्थित होते.
श्री गुरुदेव शिवगण यांनी कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक केले. प्रास्ताविकामध्ये त्यांनी जाकादेवी मध्ये सरोदे समाजाच्या संघटना विषयी माहिती दिली. अतिशय गुण्यागोविंदाने सर्व लोक राहत आहेत. समाजाची गरज म्हणून एक सामाजिक मंदिर उभे करण्याचा आम्ही प्रयत्नशील आहोत. जिल्ह्यातील आपल्या समाजाची आणि जाकादेवी तरवळ येथील परिसरातील समाजबांधव आम्हाला चांगल्या प्रकारचे सहकार्य करत आहेत.एक दिलाने राहणारी आमची लोकं हे आमचं शक्तिस्थान असल्याचे श्री. शिवगण यांनी सांगून आजच्या काळात समाजाला शिक्षणाची आवश्यकता असल्याचे सांगितले. यावेळी श्री राजेश आयरे यांनी श्री सुरज मोरे यांची जिल्हा न्यायाधीशपदी नियुक्ती झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या.
श्री सुरेंद्र रणसे यांनी समाजाने आपल्या कलागुणांना वाव द्यावा, त्याचप्रमाणे समाजातील सर्वांनी संघटित होण्यासाठी आवाहन केले. समाजातील शिक्षण, आरोग्य यासाठी रत्नागिरी जिल्हा सरोदे समाज सातत्याने प्रयत्नशील असतो. विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी, कौतुकाची थाप देण्यासाठी दरवर्षी आपण कार्यक्रमाचे आयोजन करत असल्याचे सांगितले.
सत्कारमूर्ती श्री सुरज मोरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या संविधानाची निर्मिती केली आहे, घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला स्वतःचे सामर्थ्य वाढवून आपले कर्तृत्व सिद्ध करण्याची पूर्ण संधी दिली आहे.समाजातील प्रत्येक व्यक्तीने या संधीचा उपयोग करत आपला विकास केला पाहिजे समाजाने केलेल्या सत्काराबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. भविष्यामध्ये कधीही आपण हाक मारा त्या हाकेला ओ देऊन मी कायमस्वरूपी आपल्याबरोबर राहीनं अशा प्रकारचा आशावाद त्यांनी व्यक्त केला. समाजाला समाज मंदिराची आवश्यकता आहे जेणेकरून मोठमोठे कार्यक्रम करणे सोपे होईल. तरी समाजातील व्यक्तींनी सढळ हस्ते समाज मंदिराला मदत करावी, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष श्री गुरुदेव शिवगण यांनी केली.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री उमेश शिवगण व आभार प्रदर्शन श्री शशिकांत भागवत यांनी केले. तरवळ जाकादेवी येथील समाजाचे बहुसंख्य कार्यकर्ते या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी श्री चंद्रकांत भागवत यांनी संभेल आणि तुंतूण्याच्या वाद्याने आपल्या सहकाऱ्यांसमवेत स्वागतपर अतिशय सुंदर गीत गायले.

