(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरी जिल्ह्यात गोवंशीय हत्या, गोवंशीय अवैध वाहतूक, गोवंशीय मांसाची बेकायदेशीर विक्री आणि अशा प्रकारच्या संघटित गुन्ह्यांवर प्रभावी आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस दलाने व्यापक विशेष प्रतिबंधात्मक मोहीम हाती घेतली आहे. पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात चार विशेष भरारी पथकांची स्थापना करण्यात आली असून, कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत.
महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम, १९७६, प्राण्यांना निर्दयपणे वागविण्यास प्रतिबंध अधिनियम, १९६० तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारणा) अधिनियम, १९९५ यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना सक्त निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार २३ मे २०२६ पासून जिल्ह्यातील चारही पोलीस उपविभागांसाठी स्वतंत्र भरारी पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत. या पथकांना गोवंशीय अवैध वाहतूक, गोवंशीय हत्या, तस्करी, अवैध मांस विक्री अथवा संबंधित बेकायदेशीर कृत्यांची माहिती मिळताच तातडीने छापेमारी करून दोषींविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रत्येक उपविभागासाठी स्वतंत्र कार्यक्षेत्र निश्चित करण्यात आले असून सातत्याने गस्त, तपासणी आणि गुप्त माहितीच्या आधारे कारवाया सुरू आहेत.
पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी गोवंशीय तस्करीत वारंवार सहभागी होणाऱ्या व्यक्ती तसेच संघटित गुन्हेगारी टोळ्यांविरुद्ध कठोर भूमिका घेतली असून, आवश्यकतेनुसार महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मकोका) अंतर्गतही कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा दिला आहे. या विशेष मोहिमेचे नोडल अधिकारी म्हणून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच गावपातळीवर माहिती संकलन अधिक प्रभावी करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पोलीस पाटील यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, स्थानिक पातळीवर प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर विशेष भर दिला जाणार आहे. खेड, चिपळूण, रत्नागिरी आणि राजापूर-लांजा या चारही पोलीस उपविभागांमध्ये स्वतंत्र भरारी पथके कार्यरत असून, संशयित हालचालींवर सतत लक्ष ठेवले जात आहे. गोवंशीय तस्करी किंवा अवैध कृत्यांविषयी माहिती मिळाल्यानंतर तातडीने कारवाई करण्यासाठी या पथकांना आवश्यक अधिकार देण्यात आले आहेत.
दरम्यान, रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने नागरिकांनाही या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. गोवंशीय अवैध वाहतूक, गोवंशीय हत्या किंवा संबंधित कोणत्याही बेकायदेशीर प्रकाराची माहिती मिळाल्यास डायल ११२ या आपत्कालीन हेल्पलाईनवर, संबंधित भरारी पथक अथवा जिल्हा पोलीस प्रशासनाशी तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. माहिती देणाऱ्या नागरिकांची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल, अशी ग्वाहीही पोलीस प्रशासनाने दिली आहे. कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, संघटित गुन्हेगारीला आळा आणि नागरिकांच्या सक्रिय सहभागाच्या माध्यमातून जिल्ह्यात गोवंशीय तस्करी व संबंधित बेकायदेशीर कृत्यांवर प्रभावी नियंत्रण मिळविण्याचा पोलीस प्रशासनाचा निर्धार या विशेष मोहिमेतून स्पष्ट झाला आहे.

