(चिपळूण)
सावर्डे येथील गोविंदराव निकम कॉलेज ऑफ फार्मसी आणि अहमदाबादस्थित बी. व्ही. पटेल एज्युकेशन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने “फार्मास्युटिकल संशोधनात आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशीन लर्निंगचा वापर” या समकालीन विषयावर दोन दिवसीय हँड्स-ऑन प्रशिक्षण कार्यशाळेचे दि. २८ व २९ एप्रिल रोजी यशस्वी आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेला विद्यार्थी, संशोधक आणि प्राध्यापकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यशाळेचा उद्देश सहभागीांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि मशीन लर्निंग (ML) च्या माध्यमातून औषधनिर्मिती, फॉर्म्युलेशन डेव्हलपमेंट, डेटा विश्लेषण आणि संशोधन प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याचे प्रशिक्षण देणे हा होता. फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया यांच्या २०२६-२७ पासून लागू होणाऱ्या नव्या अभ्यासक्रमात AI आधारित शिक्षणावर दिलेला भर लक्षात घेता, या कार्यशाळेचे महत्त्व अधिक अधोरेखित झाले.
अहमदाबाद येथील बी. व्ही. पटेल एज्युकेशन ट्रस्ट ही संस्था फार्मसी व allied sciences क्षेत्रात उद्योगाभिमुख आणि कौशल्याधारित शिक्षणासाठी ओळखली जाते. संशोधन आणि उद्योग यामधील दरी कमी करण्यासाठी ही संस्था विविध उपक्रम राबवित असून, त्यांच्या सहकार्यामुळे कार्यशाळेला व्यावसायिक दृष्टीकोन आणि दर्जा प्राप्त झाला.
या कार्यशाळेसाठी प्रमुख संसाधन व्यक्ती म्हणून डॉ. स्वयंप्रकाश पटेल यांनी मार्गदर्शन केले. ते फार्मास्युटिकल सायन्सेस क्षेत्रातील प्रख्यात अकॅडेमिशियन, संशोधक व पेटंट एजंट असून, AI in drug discovery, formulation development आणि predictive modelling या क्षेत्रात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली AI आधारित ड्रग डिझाईन, एक्सिपिएंट कम्पॅटिबिलिटी आणि सोल्युबिलिटी प्रेडिक्शन यांसारख्या संकल्पनांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांसह सादरीकरण करण्यात आले.
राज्यातील विविध फार्मसी महाविद्यालयांमधील एम. फार्म विद्यार्थी, संशोधक आणि प्राध्यापकांनी या कार्यशाळेत मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला. सहभागींच्या सकारात्मक अभिप्रायातून कार्यशाळेची उपयुक्तता, विषयाची सध्याची गरज आणि प्रत्यक्ष प्रशिक्षणाचे महत्त्व स्पष्ट झाले.
या कार्यशाळेमुळे सहभागींच्या संशोधन कौशल्यात वाढ होऊन AI च्या साहाय्याने अधिक अचूक, वेगवान आणि परिणामकारक संशोधन करण्यासाठी प्रोत्साहन मिळाले. तसेच, उद्योग-शिक्षण दरी कमी करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामागे समन्वयक प्रा. भारती तारे यांचे विशेष योगदान असून, सह-समन्वयक प्रा. प्रणाली दळवी, प्रा. मृणाल करंजकर, प्रा. स्नेहल आयनर आणि प्रा. पारस चव्हाण यांनी प्रभावी नियोजन व अंमलबजावणी केली.
प्राचार्य डॉ. अनिल बत्तासे, उपप्राचार्य प्रा. प्रवीण वाघचौरे तसेच सह्याद्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. शेखर निकम व कार्याध्यक्ष श्री. अनिरुद्ध निकम यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना आधुनिक संशोधनाच्या दिशेने वाटचाल करण्याची प्रेरणा मिळते, असे त्यांनी नमूद केले.
एकूणच, ही कार्यशाळा फार्मास्युटिकल शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात AI च्या प्रभावी वापरासाठी दिशादर्शक ठरली असून, भविष्यातील संशोधन पद्धतींना नवी दिशा देणारी ठरली आहे.

