(मुंबई)
चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर झाड कोसळून मृत्यू झालेल्या 11 वर्षीय विहान श्रीवास्तव याची कहाणी संपूर्ण महाराष्ट्राला हेलावून टाकणारी ठरली आहे. एका क्षणात मुलगा कायमचा दूर गेल्याचे वास्तव स्वीकारणे त्याच्या आईसाठी अशक्य झाले आहे. अपघातानंतर काही तास उलटले तरी विहानची आई जुही श्रीवास्तव मुलाची क्रिकेटची बॅट छातीशी कवटाळून शांत बसलेली होती. तिच्या डोळ्यांत एकच अपेक्षा होती… “माझा विहान आता शाळेतून घरी येईल आणि नेहमीप्रमाणे क्रिकेट खेळायला जाईल…” हे दृश्य पाहून उपस्थित प्रत्येकाचे डोळे पाणावले होते.
शाळेतून परतताना काळाने घातला घाला
मंगळवारी दुपारी चेंबूरमधील युनिव्हर्सल स्कूलची बस रस्ता क्रमांक 11 वरून जात असताना अचानक एक मोठे झाड बसवर कोसळले. या भीषण अपघातात विहान श्रीवास्तवचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर अन्य चार विद्यार्थी जखमी झाले.
क्रिकेटर बनण्याचे स्वप्न अपूर्णच राहिले
अपघातानंतर समोर आलेल्या एका व्हिडिओ आणि फोटोमध्ये विहानची आई मुलाची क्रिकेट बॅट हातात धरून सुन्न अवस्थेत बसलेली दिसते. तिच्या शेजारी बसलेल्या महिला तिला धीर देण्याचा प्रयत्न करत असल्या, तरी आईच्या डोळ्यांत फक्त मुलाच्या आठवणी होत्या.
विहानच्या शेजारी राहणाऱ्या आणि कुटुंबाच्या मैत्रीण राजी मल्होत्रा यांनी सांगितले की, विहानला क्रिकेटची प्रचंड आवड होती. “तो अनेकदा आमच्या घरी यायचा आणि म्हणायचा, ‘आंटी, मला क्रिकेटपटू व्हायचं आहे. देवला (राजी यांचा मुलगा) मला क्रिकेट शिकवायला सांगा ना.’ तो खूप हुशार, समजूतदार आणि संस्कारी मुलगा होता. क्रिकेट हेच त्याचं मोठं स्वप्न होतं.”
‘विहानला क्रिकेट खेळायला जायचं आहे…’
राजी मल्होत्रा पुढे म्हणाल्या, “जुहीचा जीव विहानमध्येच होता. तो शाळेत गेला की ती दिवसभर त्याच्याच विचारात असायची. आजही ती त्याची क्रिकेटची बॅट हातात घेऊन बसली आहे आणि सतत एकच म्हणत आहे, ‘विहानला क्रिकेट खेळायला जायचं आहे.’ तिच्यासाठी मुलगा आता या जगात नाही, हे स्वीकारणं अत्यंत कठीण झालं आहे.”
स्थानिकांच्या तत्परतेमुळे वाचले इतर विद्यार्थ्यांचे जीव
अपघाताच्या वेळी बसमध्ये एकूण 13 विद्यार्थी होते. झाड कोसळताच बसचा चालक, वाहक आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. त्यामुळे बसमधील विद्यार्थ्यांना वेळेत बाहेर काढण्यात यश आले. पाच विद्यार्थ्यांना तातडीने जवळील झेन मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी विहानला तपासल्यानंतर मृत घोषित केले.
चार विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर
रुग्णालयाचे संचालक डॉ. रॉय पाटणकर यांनी सांगितले की, जखमी विद्यार्थ्यांपैकी दोघांची सीटी स्कॅनसह सविस्तर तपासणी करण्यात आली असून सर्व चार विद्यार्थ्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. त्यांच्यावर आवश्यक उपचार सुरू आहेत.
विहान श्रीवास्तवच्या निधनाने केवळ एका कुटुंबाचा आधार हिरावला नाही, तर क्रिकेटपटू होण्याची स्वप्ने पाहणारा एक निरागस जीवही काळाच्या पडद्याआड गेला. त्याची क्रिकेटची बॅट कवटाळून मुलाच्या परतीची वाट पाहणाऱ्या आईचे दुःख शब्दांत व्यक्त करणे अशक्य आहे.

