(रत्नागिरी)
रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी दिवाळीचे औचित्याने रोटरी वूमन शॉपिंग फेस्टिव्हल पर्व ३ चा दिमाखदार शुभारंभ शूक्रवार (दि. ३) रोजी संपन्न झाला. रत्नागिरी थिबा पॅलेस रोड येथील जयेश मंगल कार्यालय येथे या फेस्टिव्हलचे उद्घाटन पोलिस निरीक्षक स्मिता सुतार, सायबर पोलिस ठाणे, यांचा हस्ते झाला. सदर प्रसंगी रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीचे अध्यक्ष प्रमोद कुलकर्णी, सेक्रेटरी रोहित विरकर, असिस्टंट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर श्रीकांत भुर्के, एरिया हेड निलेश मुळ्ये, ट्रेसरर स्वप्नील साळवी तसेच सर्व रोटरी सदस्य उपस्थित होते. गेल्या तीन वर्षा पासून होणार्या या खरेदीच्या महापर्वाची प्रतीक्षा रत्नागिरीकराना असते, ती प्रतीक्षा आज संपली. पहिल्याच दिवशी रत्नागिरीकरांनी भरघोस प्रतिसाद या फेस्टिवलला दिला.
शुक्रवार दिनांक ३ ऑक्टोबर ते रविवार ५ ऑक्टोबर सकाळी १० ते रात्री १० पर्यंत हे खरेदी पर्व सुरू राहणार आहे. सणासुदीच्या काळात लागणार्या तसेच घरगुती उपयोगाच्या सर्व वस्तूंचे भव्य दालन या ठिकाणी उपलब्ध असून, या ठिकाणी अनेक आकर्षक ऑफर्स आणि सवलतींचा पाऊस पडणार आहे.
फेस्टिव्हलमध्ये सत्तरहुन अधिक स्टॉल्स असून, गारमेंटस्, इलेक्ट्रॉनिक्स, ज्वेलरी, होम डेकोर, मसाले, आयुर्वेदिक उत्पादने, बेकरी पदार्थ यांसारख्या विविध वस्तू आणि पदार्थांवर आकर्षक ऑफर्स मिळणार आहेत. घरगुती वस्तूंपासून गाड्यांपर्यंत तसेच पेटपुजेसाठी चविष्ठ पदार्थाचे स्टॉल तसेच सर्व काही एकाच छताखाली खरेदी करण्याची ही सुवर्णसंधी आहे.

