(संगमेश्वर / प्रतिनिधी)
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिनाचे औचित्य साधून डेरवण येथील एसव्हीजेसीटी स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘ऑलिम्पिक क्रीडा सप्ताहा’चा उत्साहपूर्ण वातावरणात समारोप झाला. आठवडाभर चाललेल्या या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या माध्यमातून निरोगी जीवनशैली, क्रीडा संस्कृती आणि संघभावनेचा प्रभावी संदेश देण्यात आला.
या क्रीडा सप्ताहात एसव्हीजेसीटी स्पोर्ट्स अकॅडमीच्या शालेय विद्यार्थ्यांसह वालावलकर नर्सिंग कॉलेज, फिजिओथेरपी कॉलेज आणि वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. विविध स्पर्धा आणि उपक्रमांमधून विद्यार्थ्यांनी क्रीडा कौशल्य, शिस्त आणि सांघिक भावना यांचे उत्कृष्ट दर्शन घडवले.
क्रीडा सप्ताहातील प्रमुख आकर्षणांमध्ये सामूहिक सूर्यनमस्काराचा समावेश होता. या उपक्रमातून योगाचे महत्त्व आणि भारतीय संस्कृतीतील आरोग्यदायी परंपरेची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. फन शूटिंग स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता, संयम आणि अचूक लक्ष्य साधण्याची क्षमता विकसित झाली. तसेच बॅडमिंटन आणि टेबल टेनिस स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत स्पर्धात्मक वृत्तीची झलक दाखवली. ग्रुप स्विमिंग उपक्रमातून शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच जलसुरक्षेचे महत्त्वही विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले.
हा क्रीडा सप्ताह यशस्वी करण्यासाठी एसव्हीजेसीटी स्पोर्ट्स अकॅडमीच्या क्रीडा विभागाने विशेष परिश्रम घेतले. प्रशिक्षक विनायक पवार, प्रतीक्षा पेंढारी, सागर साळवी आणि अविनाश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व स्पर्धा आणि उपक्रम शिस्तबद्ध व यशस्वीरीत्या पार पडले.
सर्वांगीण विकासासाठी क्रीडा आवश्यक : श्रीकांत पराडकर
यावेळी अकॅडमीचे क्रीडा संचालक श्रीकांत पराडकर म्हणाले, “ऑलिम्पिक चळवळ ही केवळ खेळापुरती मर्यादित नसून निरोगी, सक्षम आणि जबाबदार समाज घडविण्याचे प्रभावी माध्यम आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच नियमितपणे क्रीडा क्षेत्रात सहभागी झाल्यास त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होण्यास मोठी मदत होते.”

