(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरी जिल्हा परिषदेअंतर्गत केंद्रप्रमुखांच्या १२५ पदांसाठी सोमवारी (२९ जून) जिल्हा परिषद सभागृहात समुपदेशन प्रक्रिया पार पडली. या प्रक्रियेत १२५ पैकी ११६ उमेदवारांचे समुपदेशन पूर्ण करण्यात आले असून, त्यांच्या कार्यकेंद्रांची निश्चिती करण्यात आली आहे. मात्र, उर्दू आणि अपंग प्रवर्गातील पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्याने नऊ पदे अद्याप रिक्त राहिली आहेत.
शासनाच्या निर्देशानुसार ३० जूनपूर्वी समुपदेशन प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असल्याने जिल्हा परिषद प्रशासनाने नियोजनबद्ध पद्धतीने ही प्रक्रिया पार पाडली. दिवसभर चाललेल्या समुपदेशनानंतर पात्र उमेदवारांना त्यांच्या पसंतीनुसार आणि उपलब्धतेनुसार केंद्रांचे वाटप करण्यात आले. समुपदेशन प्रक्रिया पूर्ण झाली असली, तरी संबंधित केंद्रप्रमुखांना अद्याप नियुक्तीपत्रे देण्यात आलेली नसल्याची माहिती जिल्हा परिषदेचे अर्थ व शिक्षण सभापती नंदकुमार मुरकर यांनी दिली. नियुक्तीपत्रे वितरित झाल्यानंतर नव्याने नियुक्त केंद्रप्रमुख प्रत्यक्ष कार्यभार स्वीकारतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या समुपदेशन प्रक्रियेला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे, उपाध्यक्ष विलास चाळके, समाजकल्याण सभापती ॲड. सुयोग कांबळे, कृषी सभापती महेंद्र नाटेकर, शिक्षणाधिकारी सुनीता शिरभाते तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. केंद्रप्रमुखांच्या नियुक्तीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचल्याने जिल्ह्यातील शैक्षणिक प्रशासनाला अधिक गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. रिक्त राहिलेल्या उर्दू व अपंग प्रवर्गातील पदे भरण्याबाबत पुढील निर्णय शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार घेतला जाणार असल्याचेही प्रशासनाकडून सांगण्यात आले.

