(रत्नागिरी)
जयगड–निवळी हा मार्ग नेहमीच मोठ्या प्रमाणावर वाहतुकीचा असल्याने वर्दळीचा मानला जातो. जिंदाल एनर्जी, जयगड पोर्ट तसेच आंग्रे पोर्ट येथून अवजड वाहनांची सातत्याने ये-जा सुरू असते. याशिवाय नियमित वाहतूकही मोठ्या प्रमाणावर होत असते.
मात्र, या मार्गावर ओव्हरलोड अवजड वाहने वळणावर किंवा चढावर वारंवार बंद पडत असल्याने वाहतुकीचा खोळंबा होत असल्याच्या तक्रारी वारंवार पुढे येत आहेत. ओव्हरलोड आणि अतिवेगामुळे अपघातांचे प्रमाणही वाढले असून अनेक निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत.
असाच प्रकार आज कळझोंडी फाटा क्रमांक १ जवळ घडला. एका अवजड वाहनाने अचानक बंद पडत रस्त्याचा मोठा भाग व्यापल्याने दोन्ही बाजूंची वाहतूक अडथळाग्रस्त झाली. वाहनचालकांना ये-जा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.
या प्रकारामुळे स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांमध्ये नाराजी व्यक्त होत असून, अशा घटनांकडे प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) गांभीर्याने लक्ष देत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. संबंधित यंत्रणांनी तातडीने उपाययोजना करून वाहतूक सुरळीत करावी, अशी मागणीही पुढे येत आहे.

