(रत्नागिरी /प्रतिनिधी)
संगमेश्वर तालुक्यातील आंबेड बुद्रुक येथे सख्ख्या भावाला बेदम मारहाण केल्याप्रकरणी देवरुख न्यायालयाने सुनावलेली शिक्षा रत्नागिरी सत्र न्यायालयाने कायम ठेवली आहे. या प्रकरणी आरोपी सखाराम नारायण रहाटे (वय ६२, रा. आंबेड बुद्रुक, ता. संगमेश्वर) याला सहा महिने सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली असून त्याविरोधातील अपील न्यायालयाने फेटाळले.
रत्नागिरी अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनिलकुमार अंबाळकर यांनी हा निकाल दिला. सरकार पक्षातर्फे अॅड. अनुपमा ठाकूर यांनी युक्तिवाद केला. खटल्यातील माहितीनुसार, आरोपी सखाराम रहाटे व त्यांचे मोठे बंधू अनंत नारायण रहाटे (वय ७१) यांच्यात वारंवार वाद होत असत. १० मार्च २०१७ रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास अनंत रहाटे हे सोनगिरी बसस्टॉप परिसरातून किराणा सामान घेऊन घरी परतत असताना आरोपीने पाठीमागून येत त्यांच्या पाठीवर दांडक्याने प्रहार केला. या हल्ल्यात ते खाली कोसळले. त्यानंतर आरोपीने लाथाबुक्क्यांनी व ठोशांनी मारहाण करत शिवीगाळ केली. तसेच “मला जेलमध्ये जाण्याची सवय आहे; दोन खून करायचे आहेत, त्यातील पहिला तुलाच संपवतो,” अशी धमकीही दिल्याचे न्यायालयीन नोंदीत नमूद आहे.
या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३२६, ३२५ व ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल केला. तपास पूर्ण करून दोषारोपपत्र देवरुख न्यायालयात सादर करण्यात आले. १६ फेब्रुवारी २०२३ रोजी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी बी. डी. तारे यांनी आरोपीला भादंवि कलम ३२५ व ५०६ अंतर्गत दोषी ठरवत सहा महिने सक्तमजुरी व दंडाची शिक्षा सुनावली होती.
दरम्यान, या शिक्षेविरुद्ध आरोपीने सत्र न्यायालयात अपील दाखल केले होते. मात्र, साक्षीपुरावे व घटनेचे गांभीर्य लक्षात घेता सत्र न्यायालयाने २८ एप्रिल रोजी अपील फेटाळून लावत खालच्या न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. या निकालामुळे हिंसाचाराच्या घटनांविरुद्ध न्यायव्यवस्थेची ठाम भूमिका पुन्हा अधोरेखित झाली आहे.

