(चिपळूण)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते तथा माजी आमदार नितीन सरदेसाई यांनी चिपळूण येथे झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात शेकडो कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत करत, “चिपळूणमध्ये सुरू झालेला पक्षप्रवेशाचा पॅटर्न आगामी काळात संपूर्ण राज्यात पाहायला मिळेल. परशुराम भूमीतून बदलाची सुरुवात झाली आहे,” असा विश्वास व्यक्त केला.
मनसेचे नेते नितीन सरदेसाई आणि शिरीष सावंत यांच्या दोन दिवसीय रत्नागिरी जिल्हा दौऱ्यानिमित्त चिपळूण येथील हॉटेल अतिथीमध्ये आढावा बैठक आणि त्यानंतर पक्षप्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी चिपळूण शहरासह ग्रामीण भागातील शेकडो कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर प्रवेश केला. मुसळधार पावसाची पर्वा न करता मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहिले. पक्षप्रवेशानंतर मनसे आणि पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
उपस्थितांना संबोधित करताना नितीन सरदेसाई म्हणाले, “सत्ता नसतानाही महाराष्ट्राच्या हितासाठी आणि राज ठाकरे यांच्या विचारांवर विश्वास ठेवून कार्यकर्ते मनसेत प्रवेश करत आहेत. पारंपरिक राजकारणाला नागरिक कंटाळले असून पर्याय म्हणून मनसेकडे आशेने पाहत आहेत. चिपळूणमध्ये दिसलेली ही ताकद लवकरच संपूर्ण जिल्ह्यात आणि राज्यात विस्तारेल.”
यावेळी गोवळकोट येथील चांद अलीशहा यांच्यासह सुमारे २० मुस्लिम कार्यकर्त्यांनीही मनसेत प्रवेश केला. तसेच माजी ग्रामपंचायत सदस्य संजय सुतार, उमेश पवार, तानाजी खेराडे, संतोष देवरुख, अभिजित कोलगे, प्रवीण माने, सचिन गायकवाड, नितीन घाडगे, किरण खेतले यांच्यासह विविध गावांतील शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला.
या कार्यक्रमाला संतोष कदम, वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू खेतले, जिल्हा सचिव सचिन गायकवाड, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद गांधी, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष उमेश लटके, वाहतूक सेना खेड तालुकाध्यक्ष पप्पू आंब्रे, चिपळूण वाहतूक तालुकाध्यक्ष मिलिंद कदम, राजेंद्र गोजारी, ॲड. वृषाली सावंत, विनोद चिपळूणकर, भाई सुर्वे, संजय वाजे यांच्यासह मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

