(खेड / वार्ताहर)
दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात २६ वर्षीय तरुणाला प्राण गमवावे लागले, तर त्याच्यासोबत प्रवास करणारा २१ वर्षीय तरुण जखमी झाला. भेलसई ते खेर्डी मार्गावर भेलसई खांबेवाडी येथील वळणावर बुधवारी, दि. ११ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ८.४५ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. रविंद्र भागुराम तांबे (वय २६, रा. भेलसई बौद्धवाडी, ता. खेड) असे मृत तरुणाचे नाव असून, हर्षद संजय तांबे (वय २१, रा. भेलसई, ता. खेड) हे जखमी झाले आहेत.
अपघातानंतर जखमी हर्षद तांबे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खेड पोलीस ठाण्यात मयत दुचाकी चालक रविंद्र तांबे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची अधिकृत नोंद १२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजता करण्यात आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविंद्र तांबे आणि हर्षद तांबे हे दोघे होंडा शाईन दुचाकी (एमएच ०८ ए.डब्ल्यू. ६५६१) घेऊन भेलसई येथून खेर्डीच्या दिशेने निघाले होते. प्रवासादरम्यान भेलसई खांबेवाडी येथील वळणावर रविंद्र यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे दुचाकी रस्त्याच्या साईडपट्टीवरून पुढे जात मोरीवरील पुलाच्या सिमेंट कठड्यावर जोरात आदळली.
या धडकेत दुचाकी चालवत असलेल्या रविंद्र तांबे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. दुचाकीवर मागे बसलेले हर्षद तांबे यांच्या डाव्या हाताच्या मनगटाला आणि डोक्याला दुखापत झाली असून, अपघातात दुचाकीचेही मोठे नुकसान झाले आहे.
याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३५४/२०२६ नुसार भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम १०६ (१), २८१, १२५ (अ), १२५ (ब) तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ आणि ३ (१)/१८१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघाताचा पुढील तपास खेड पोलीस करीत आहेत.


