(नाशिक / वार्ताहर)
कुंभमेळ्यासाठी साधुग्राम तपोवनातच उभारले पाहिजे. कुंभमेळ्याच्या जागेला पर्याय असू शकत नाही. साधुग्रामसाठी जागा देण्यास शेतकऱ्यांचा विरोध असल्यास शासनाने त्यांची थकीत देणी आधी अदा करावीत. शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये, तसेच या प्रश्नामुळे कुंभमेळ्याच्या आयोजनात अडथळे निर्माण होऊ नयेत. गरज पडल्यास या विषयात मध्यस्थी करण्यास आम्ही तयार आहोत, अशी ठाम भूमिका जगद्गुरू श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांनी आज (गुरुवारी, दि. २९) रोजी नाशिक येथे आयोजित पत्रकार परिषदेत मांडली.
आईला जसा दुसरा पर्याय असू शकत नाही, तसाच कुंभमेळ्याच्या जागेलाही पर्याय असू शकत नाही, असे स्पष्ट करत त्यांनी साधुग्रामचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याची आवश्यकता अधोरेखित केली. यावेळी अखिल भारतीय अखाडा परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते महंत संजयदास महाराज, निर्वाणी अखाड्याचे श्रीमंत मुरली दास महाराज, निर्वाणी अणी आखाड्याचे महासचिव महंत सत्यदेवदास महाराज, महासचिव महंत नंदरम दास महाराज, महंत डॉ. महेशदास महाराज, महंत राजेशदास महाराज, महंत भक्तिचरण दास महाराज आणि महंत हेमंत दास महाराज आदी उपस्थित होते.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी होणारी वृक्षतोड आणि पर्यावरणाच्या प्रश्नावर बोलताना नरेंद्राचार्य महाराज यांनी विकासासोबतच निसर्गाचे संरक्षण करण्याचे आवाहन केले. विकासकामांसाठी काही प्रमाणात वृक्षतोड अपरिहार्य असली, तरी तोडलेल्या झाडांची अन्य ठिकाणी पुनर्लागवड करून ती जगविण्याची जबाबदारी शासनाने पार पाडली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. ओसाड डोंगरांवर वृक्षारोपण करण्यासोबतच कमीत कमी झाडे तोडून साधुग्रामचा प्रश्न मार्गी लावावा, असे आवाहनही त्यांनी केले. वृक्षतोडीच्या मुद्द्यावर सुवर्णमध्य काढून विकास आणि पर्यावरण यांचा समतोल साधण्याची भूमिका त्यांनी मांडली.
दरम्यान, ३० ऑक्टोबर रोजी ध्वजपूजन आणि ग्रामपरिक्रमेची भव्य शोभायात्रा आयोजित करण्यात आली असून, त्यात हजारो भाविक सहभागी होणार आहेत. तसेच ३१ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत होणाऱ्या धर्मध्वजारोहण सोहळ्याला रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
दुष्काळातही कुंभमेळा आवश्यक
दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता साधुसंतांचा पाण्याबाबत कोणताही अट्टहास नसल्याचे नरेंद्राचार्य महाराज यांनी स्पष्ट केले. रामकुंडात थोडेफार पाणी सोडले, तरी साधुसंतांची सहकार्याची भूमिका राहील, असे त्यांनी सांगितले. दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना आणि जनावरांना मदत करण्यासाठी साधुसंत शासनाच्या खांद्याला खांदा लावून उभे राहतील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. कुंभमेळ्यावरील खर्चावर टीका करणाऱ्यांनी दुष्काळ निवारणाची गरज आणि धार्मिक परंपरांचे महत्त्व या दोन्ही बाबींचा विचार करावा, असे मत त्यांनी व्यक्त केले. गोदावरी नदीत गटारीचे पाणी मिसळण्याचे प्रकार थांबवून नदीचे प्रदूषण रोखणे आवश्यक असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
‘जेन झी’ने देशहिताला प्राधान्य द्यावे
‘जेन झी’ ही देशाची मोठी ताकद असल्याचे सांगत नरेंद्राचार्य महाराज यांनी तरुणांनी संविधानाच्या चौकटीत राहून आपल्या मागण्यांसाठी आंदोलने करावीत, असे आवाहन केले. पेपरफुटीविरोधातील आंदोलनाला आपला पाठिंबा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, विघातक शक्तींनी तरुणांचा वापर करून देशाचे नुकसान करू नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.


