( रियाध /सौदी अरेबिया )
सौदी अरेबियातील सरकारी तेल कंपनी अरामको (Aramco) च्या हेलिकॉप्टरला रविवारी सकाळी भीषण अपघात झाला. देशाच्या पूर्वेकडील रास तानुरा परिसरात हेलिकॉप्टर कोसळून त्यामधील सर्व 14 प्रवाशांचा मृत्यू झाला. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून अधिकाऱ्यांनी सखोल तपास सुरू केला आहे. सौदी प्रेस एजन्सीने ऊर्जा मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात स्थानिक वेळेनुसार सकाळी सुमारे 6 वाजता घडला. हेलिकॉप्टरमधील मृत्यूमुखी पडलेले सर्व 14 जण सौदी नागरिक असल्याचे सांगण्यात आले आहे.
अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट नाही
हेलिकॉप्टर नेमके कोणत्या कारणामुळे कोसळले, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. तांत्रिक बिघाड, हवामान किंवा अन्य कोणते कारण होते का, याचा तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे. ऊर्जा मंत्रालयाने या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत.
अरामको ही जगातील सर्वात मोठी तेल कंपनी
अरामको ही जगातील सर्वात मोठ्या तेल कंपन्यांपैकी एक असून तिचा बहुतांश हिस्सा सौदी अरेबिया सरकारच्या मालकीचा आहे. अलीकडे मध्य पूर्वेतील तणाव आणि इराणशी संबंधित घडामोडींमुळे तेल पुरवठ्यावर परिणाम झाला होता. त्यावेळी अरामकोने होर्मुझ सामुद्रधुनीवरील अडथळे टाळण्यासाठी काही प्रमाणात तेल निर्यात पाइपलाइनद्वारे वळवल्याची माहिती दिली होती.
फ्रान्समध्येही विमान दुर्घटना; 11 जणांचा मृत्यू
दरम्यान, फ्रान्समध्येही रविवारी आणखी एक भीषण हवाई दुर्घटना घडली. ईशान्य फ्रान्समधील नॅन्सी शहराजवळ स्कायडायव्हिंगसाठी वापरले जाणारे एक लहान विमान कोसळून त्यातील सर्व 11 जणांचा मृत्यू झाला. स्थानिक अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, अपघात सकाळी सुमारे 11 वाजता झाला. घटनास्थळी तातडीने बचाव आणि आपत्कालीन पथके दाखल झाली. अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून ब्लॅक बॉक्स आणि तांत्रिक तपासणीनंतरच नेमके कारण समोर येणार आहे. फ्रान्समधील अलीकडच्या काळातील ही सर्वात गंभीर विमान दुर्घटनांपैकी एक मानली जात आहे.

