(संगमेश्वर / एजाज पटेल)
घराकडे परतण्यासाठी नेहमीप्रमाणे एसटी बसमध्ये बसलेल्या एका ७१ वर्षीय वृद्धाचा बस सुटण्यापूर्वीच अचानक मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज (रविवारी) दुपारी संगमेश्वर बस स्थानकात घडली. जलाल हुसेन वणु (वय ७१, रा. मुस्लिम मोहल्ला, कळबस्ते) असे मृत वृद्धाचे नाव असून, या घटनेमुळे कळबस्ते परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
संगमेश्वर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जलाल वणु हे दुपारी संगमेश्वर येथून आपल्या कळबस्ते गावाकडे जाण्यासाठी बस स्थानकात आले होते. अणदेरी-कळबस्ते या एसटी बसमध्ये ते प्रवाशांसोबत आपल्या जागेवर बसले होते. बस सुटण्याची प्रतीक्षा सुरू असतानाच दुपारी सुमारे १.४० वाजता त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले आणि ते जागेवरच बेशुद्ध झाले.
ही घटना लक्षात येताच बसमधील प्रवासी, चालक संजय पांडुरंग जाधव, वाहक तसेच स्थानकावरील वाहतूक नियंत्रक यांनी तातडीने धाव घेतली. कोणताही विलंब न लावता त्यांना एसटी बसमधूनच संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले.
कळबस्ते गावावर शोककळा
जलाल वणु हे त्यांच्या शांत आणि सुस्वभावी व्यक्तिमत्त्वामुळे परिसरात परिचित होते. नेहमीप्रमाणे प्रवासासाठी घराबाहेर पडलेल्या वणु यांचा असा अचानक मृत्यू झाल्याची बातमी गावात पोहोचताच कळबस्ते परिसरावर शोककळा पसरली.
या प्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रत्नागिरी नियंत्रण कक्षाचे पोलीस निरीक्षक प्रवीण रणदिवे यांनी रुग्णालय व घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल व्ही. व्ही. मनवल आणि सी. ए. उत्तेकर करत आहेत.

