(रत्नागिरी / प्रतिनिधी)
मुंबई–गोवा महामार्गावरील हातखंबा तिठानजीकच्या धाब्याजवळ रविवारी (दि. ७) पहाटे झालेल्या अपघातात एका नेपाळी पादचार्याचा जागीच मृत्यू झाला. अंतराम मंगलरामद थारू (वय ५०, रा. कैलाली, नेपाळ) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. अपघातानंतर वाहनचालकाने घटनास्थळावरून पलायन केल्याने स्थानिकांकडून संताप व्यक्त होत आहे.
या प्रकरणी मुनिया जोखनलाल चौधरी (वय ५५, रा. कैलाली, नेपाळ) यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे अंतराम थारू हे आपल्या खडगबहाद्दर हरिराम चौधरी, रामशरण आणि हिंगूलाल थारू या सहकाऱ्यां सह निवळीवरून हातखंब्याकडे पायी जात होते. हातखंबा तिठ्यावरील एका गॅरेजसमोरील रस्त्यावर ते येत असताना, निवळी बाजूकडून येणाऱ्या अज्ञात कारने अंतराम थारू यांना जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की ते रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाले आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला.
धडक दिल्यानंतर संबंधित कारचालकाने क्षणात पळ काढल्याने त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. अपघातस्थळी पंचनामा करून मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणीसाठी हलविण्यात आला. या घटनेमुळे महामार्गावरील बेदरकार वाहनचालकांबद्दल पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

