(राजापूर / तुषार पाचलकर)
राजापूर तालुक्यातील पाचल पंचक्रोशी शिक्षण मंडळ, पाचल संचालित सरस्वती विद्या मंदिर, पाचल या प्रशालेचे माजी मुख्याध्यापक कै. चंद्रकांत बापूजी साखळकर (हेडसर) यांचा १६ डिसेंबर हा जन्मदिवस गेल्या सहा वर्षांपासून ‘कृतज्ञता दिवस’ म्हणून साजरा केला जात आहे. “गुरुवर्य चं. बा. साखळकर प्रतिष्ठान” यांच्या वतीने यंदाही मंगळवार, दि. १६ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता, वाडिया हॉल, सरस्वती विद्या मंदिर, पाचल येथे हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या कृतज्ञता दिवसाच्या कार्यक्रमात शाळेचे माजी छात्र-छात्रा, विद्यार्थी-विद्यार्थिनी, तसेच गुरुवर्य चं. बा. साखळकर प्रतिष्ठान आणि पाचल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, पाचल या संस्थांचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत. परिसरातील सर्व नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.
शिस्तप्रिय, नीतिनियमाने वागणारे आणि विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावणारे कै. चं. बा. साखळकर यांचा जन्म दि. १६ डिसेंबर १९३५ रोजी झाला, तर त्यांचे निधन दि. २६ ऑगस्ट २०१७ रोजी झाले. त्यांनी जून १९६४ ते मे १९९४ या कालावधीत ३० वर्षे सरस्वती विद्या मंदिर, पाचल येथे निःस्वार्थ सेवा करत मुख्याध्यापक म्हणून कार्य केले.
शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या निवासाची गरज ओळखून किसान छात्रालय आणि जानकीबाई शेट्ये कन्या छात्रालय सुरू करण्यामध्ये साखळकर सरांचा मोलाचा वाटा होता. त्यांच्या या दूरदृष्टीपूर्ण योगदानाची जाणीव ठेवूनच, छात्रालयाच्या वतीनेही हा दिवस उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात येत असल्याचे आयोजकांनी सांगितले.
कै. चंद्रकांत (हेडसर) साखळकर यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि नैतिक योगदानाची आठवण जागवणारा हा कृतज्ञता दिवस विद्यार्थ्यांसह संपूर्ण पाचल पंचक्रोशीसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

