(संगमेश्वर / एजाज पटेल)
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सोनवी पुलावर सुरू असलेल्या एकाच मार्गिकेवरील दुहेरी वाहतुकीमुळे अपघातांची मालिका सुरूच असून, आज (शुक्रवारी) सायंकाळी चारच्या सुमारास दोन चारचाकी वाहनांची समोरासमोर भीषण धडक झाली. अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की, एका वाहनाचे मागील चाक अक्षरशः तुटून बाहेर पडले, तर दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने दोन्ही वाहनांतील प्रवासी बचावल्याने मोठी जीवितहानी टळली.
पुलाच्या एका मार्गिकेचे काम पूर्ण झाल्यानंतर प्रशासनाने त्याच मार्गिकेवरून दोन्ही बाजूंची वाहतूक सुरू केली आहे. मात्र, पुलावरील तीव्र वळणामुळे समोरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज चालकांना वेळेत येत नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.
आज गोव्याच्या दिशेने जाणारे एमएच-४३ एएल-१७१५ आणि मुंबईच्या दिशेने येणारे एमएच-४७ सीडी-६९४७ हे वाहन वळणावर समोरासमोर आले. एकाच मार्गिकेतून दोन्ही बाजूंची वाहतूक सुरू असल्याने चालकांना वाहनांवरील नियंत्रण राखता आले नाही आणि जोरदार धडक झाली.
गेल्या अवघ्या आठ दिवसांत या पुलावरील हा तिसरा मोठा अपघात आहे. काही दिवसांपूर्वी कंटेनर आणि आयशर टेम्पो यांच्यात समोरासमोर धडक होऊन तिघेजण जखमी झाले होते. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी ‘छोटा हत्ती’ आणि चारचाकी वाहनामध्येही अपघात झाला होता. या घटनांनंतरही वाहतूक व्यवस्थेत कोणताही बदल करण्यात आलेला नसल्याने वाहनचालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांच्या मते, पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत एकाच मार्गिकेवरून एकावेळी फक्त एका दिशेची वाहतूक सुरू ठेवावी. तसेच वाहतूक नियंत्रित करण्यासाठी पोलीस किंवा वाहतूक कर्मचारी कायमस्वरूपी तैनात करावेत. अन्यथा भविष्यात एखादी गंभीर दुर्घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित प्रशासन आणि महामार्ग ठेकेदारावर राहील, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

