( चिपळूण /प्रतिनिधी )
मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पाग पॉवरहाऊस क्रॉसिंग येथे अंधारामुळे अपघाताचा धोका वाढला होता. स्थानिक नागरिकांच्या सततच्या तक्रारी आणि सामाजिक कार्यकर्ते सुयोग चव्हाण यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर अखेर येथे लाईटची व्यवस्था करण्यात आली आहे.
पाग भागातील रहिवाशांना महामार्ग ओलांडताना रात्रीच्या अंधारात मोठी अडचण येत होती. त्यामुळे अपघातांची शक्यता वाढली होती. या समस्येकडे लक्ष वेधून सुयोग चव्हाण यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी वारंवार चर्चा केली. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळताच, क्रॉसिंगवरील अंधार दूर करण्यासाठी लाईट बसविण्यात आले. यामुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून नागरिकांनी या कामाचे कौतुक केले आहे.
मात्र, अजूनही काही भाग अंधारात असल्याने संपूर्ण सुरक्षितता सुनिश्चित झालेली नाही. त्यामुळे या ठिकाणी आणखी एक हायमास्ट लाईट बसविण्याच्या दृष्टीने सुयोग चव्हाण प्रयत्न करत आहेत. यासाठी ते लवकरच संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करणार असून यालाही सकारात्मक प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा आहे. वाहतूक व्यवस्थापन, सुरक्षा आणि स्थानिकांच्या मूलभूत गरजांसाठी पुढेही काम करत राहीन असे सुयोग चव्हाण यांनी सांगितले.

