( विशेष /प्रतिनिधी )
शहरातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या थिबा राजा कालीन बुद्ध विहाराच्या जागेवर सध्या शासकीय कम्युनिटी सेंटर व म्युझियमचे बांधकामाच्या पार्श्वभूमीवर बौद्ध जनतेमध्ये उसळलेला तीव्र असंतोष, अखेर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकर यांच्या पर्यंत पोहोचला आहे. बौद्ध समाजातील ज्येष्ठ लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते अनिल जाधव यांनी थेट आनंदराज आंबेडकरांची भेट घेऊन या मुद्यावर निवेदन सादर केले होते. त्यानंतर, मंगळवारी दिनांक १३ मे २०२५ रोजी शासकीय विश्रामगृह रत्नागिरी येथे सभेचे आयोजन करण्यात आले.
या सभेत आनंदराज आंबेडकर यांनी समाजाच्या भावना जाणून घेतल्या आणि ट्रस्टच्या भूमिकेबाबत थेट संवाद साधण्याचा प्रयत्न केला. आंबेडकर यांनी सभेत ट्रस्टच्या कार्यकारिणीला व्यासपीठावर स्थान दिले होते तरी देखील, कम्युनिटी सेंटरच्या संदर्भात समाजात निर्माण झालेला संताप इतका प्रखर होता की, सभागृहात अनेकांनी ट्रस्टविरोधी साडेतोड भूमिका मांडून वातावरण दणाणून सोडले. संपूर्ण समाजाने एकमुखाने “बुद्ध विहारच हवे, कम्युनिटी सेंटर कोणत्याही कागदावर नको” अशी ठाम भूमिका मांडली.
सभेत पँथर संघटनेचे किशोर पवार, अनिल जाधव, रत्नदीप कांबळे, देवेंद्र कांबळे, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र कांबळे, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष अनंत कांबळे, ॲड प्रविण कांबळे, राकेश कांबळे, ॲड संदीप जाधव, भिमयुवा पँथर संघटनेचे अध्यक्ष अमोल जाधव, पंचायतचे ज्येष्ठ सदस्य तु. गो. सावंत तसेच समाजातील इतर मान्यवरांनी कम्युनिटी सेंटरच्या मागणीसाठी न्यायालयात ट्रस्टने सादर केलेली माहिती, प्रशासनाकडे केलेली लेखी मागणी, तसेच ट्रस्टच्या काही पदाधिकाऱ्यांनी राजकीय प्रचारांतील सहभाग यांच्यासह अनेक मुद्दे उपस्थित करीत अचूक विश्लेषण केले. सभेत ट्रस्टच्या अध्यक्ष व सदस्यांना बोलण्याची संधी नाकारण्यात आली, हीच समाजाच्या मनातील असंतोषाची तीव्रता दर्शवणारी बाब ठरली.
सभेत मांडलेल्या आक्रमक भूमिका मान आनंदराज आंबेडकरांनी लक्षात आल्यानंतर समाज आणि ट्रस्टमध्ये निर्माण झालेली तेढ लक्षात घेत ती कमी करण्याचा प्रयत्न करताना मान. आनंदराज आंबेडकरांनी उपस्थित बांधवांशी संवाद साधत, “थिबा राजा कालीन बुद्ध विहारासाठी राखीव ठेवलेली जागा पुन्हा बुद्ध विहारासाठी आरक्षित करण्यात यावी, यासाठी मी स्वतः पुढाकार घेईन व सर्वतोपरी सहकार्य करीन,” असे स्पष्टपणे जाहीर केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू म्हणून बौद्ध समाजात त्यांना मिळणारे प्रचंड आदर आणि विश्वास पाहता, त्यांच्या या भूमिकेने या संघर्षाला नवे वळण मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
परंतु समाज आणि ट्रस्ट यांच्यात निर्माण झालेली तीव्र दरी सहजासहजी भरून निघेल का, हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. बुद्ध विहाराच्या निर्मितीसाठी धगधगत असलेल्या भावना, सामाजिक अस्मितेचा लढा आणि ऐतिहासिक वारशाच्या जपणुकीसाठीचा हा संघर्ष याला न्यायालयीन आणि प्रशासकीय पातळीवर किती प्रतिसाद मिळतो, यावर या आंदोलनाचे भविष्य अवलंबून आहे. समाजाचा आवाज केवळ घोषणांमध्ये न राहता, तो शासनाच्या निर्णयप्रक्रियेपर्यंत पोहोचतो का, हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. येणाऱ्या काळातच हे स्पष्ट होईल की, या ऐतिहासिक जागेवर वास्तवात बुद्ध विहार उभे राहते की, हा लढा केवळ आश्वासनांच्या भोवऱ्यात अडकून राहतो.

