(नवी दिल्ली)
मध्य-पूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर होर्मुजची सामुद्रधुनी येथे अडकलेल्या भारतीय जहाजांच्या सुटकेला आता वेग आला आहे. भारताची ‘पाइन गॅस’ आणि ‘जग वसंत’ ही दोन एलपीजी टँकर्स सोमवारी पहाटे पर्शियन आखातातून सुरक्षितपणे बाहेर पडली आहेत. या दोन्ही जहाजांवर मिळून सुमारे 92 हजार टन एलपीजी साठा असून, पुढील दोन दिवसांत ती भारतीय बंदरांवर पोहोचण्याची शक्यता आहे.
सुरक्षित मार्गाने बाहेर पडली जहाजे
शिप ट्रॅकिंग डेटानुसार, ही दोन्ही जहाजे इराणच्या लारक आणि किश्म बेटांदरम्यानच्या मार्गाने पुढे सरकली. या मार्गाचा वापर तांत्रिक पडताळणी आणि ओळख स्पष्ट करण्यासाठी करण्यात आला. बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाचे विशेष सचिव राजेश कुमार सिन्हा यांनी सांगितले की, आखाती देशांतून भारतात पोहोचण्यासाठी साधारण दोन ते अडीच दिवस लागतात. त्यामुळे उद्या बुधवारपर्यंत हा गॅस साठा देशात दाखल होण्याची शक्यता आहे.
92 हजार टन LPGचा मोठा दिलासा
या दोन जहाजांमधील 92,000 टन एलपीजी हा भारताच्या साधारण एका दिवसाच्या घरगुती गॅस गरजेइतका आहे. यापूर्वी ‘एमटी शिवालिक’ आणि ‘एमटी नंदा देवी’ ही जहाजे 92,712 टन एलपीजी घेऊन मुंद्रा बंदर आणि कांडला बंदर येथे दाखल झाली आहेत. पुरवठा साखळी सुरळीत करण्यासाठी ही महत्त्वाची स्थिती मानली जात आहे.
अजून 22 जहाजे अडकलेली
युद्धजन्य परिस्थिती सुरू झाली तेव्हा होर्मुजमध्ये भारताची 28 जहाजे अडकली होती. त्यापैकी काही जहाजे बाहेर काढण्यात यश आले असले, तरी अजूनही 22 जहाजे आणि सुमारे 600 भारतीय नाविक पश्चिम भागात अडकलेले आहेत. यामध्ये 7 एलपीजी कॅरिअर, 1 एलएनजी टँकर, 4 कच्चे तेल वाहून नेणारे टँकर तसेच काही कंटेनर आणि बल्क कॅरिअर जहाजांचा समावेश आहे.
इराणकडून कडक तपासणी
सध्या इराणकडून या मार्गावरून जाणाऱ्या प्रत्येक जहाजाची सखोल तपासणी केली जात आहे. जहाजाची मालकी, मालाचा प्रकार आणि आंतरराष्ट्रीय संबंध तपासल्यानंतरच पुढे जाण्याची परवानगी दिली जात आहे. अडकलेल्या जहाजांवर अन्न व पाण्याचा पुरेसा साठा असून, केंद्र सरकार सर्व नाविकांच्या सुरक्षिततेसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न करत आहे.
भारतासाठी होर्मुजचे महत्त्व
होर्मुजची सामुद्रधुनी हा भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा जलमार्ग आहे. देशाच्या कच्च्या तेलापैकी सुमारे 88%, नैसर्गिक वायूपैकी 50% आणि एलपीजीपैकी 60% आयात याच मार्गाने होते. या मार्गावर तणाव निर्माण झाल्यास देशांतर्गत इंधन टंचाई आणि दरवाढीचा धोका वाढू शकतो. त्यामुळे अडकलेल्या जहाजांची सुरक्षित सुटका भारतासाठी अत्यंत आवश्यक मानली जात आहे.

