(रत्नागिरी)
गोवा येथे खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेला आणि ३० दिवसांच्या पॅरोलवर रत्नागिरीत आलेला आरोपी रजा संपल्यानंतर कारागृहात परत न गेल्यामुळे त्याच्यावर रत्नागिरी शहर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रत्नागिरीमध्ये तो
तो मिरकरवाडा येथे राहत होता. चन्नाप्पा सरन्नाप्पा गंगवार (३३, – मूळ रा. विजापूर, कर्नाटक) असे या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरोधात गोवा राज्यातील मरगाव शहर पोलिस स्थानकाच्या २६ सप्टेंबर २०११ रोजी खुनाचा गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात त्याला मरगाव अतिरिक्त सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. तेव्हापासून तो दक्षिण गोव्यातील बारदेस तालुक्यातील कोलावले येथील कारागृहात होता. ११ जुलै २०२४ ते ९ ऑगस्ट २०२४ अशी एकूण ३० दिवसांची पॅरोल रजा मंजूर करण्यात आली होती.
या कालावधीत तो रत्नागिरीच्या मिरकरवाडा येथे मस्तान मोहल्ल्यात एका व्यक्तीकडे राहणार होता. ३० दिवसांची रजा भोगून ९ ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत त्याने स्वतःहून कोलावले कारागृहात हजर होणे आवश्यक होते. परंतु तो अद्याप हजर झालेला नाही. त्यामुळे कोलावले कारागृहातून रत्नागिरी पोलिस अधीक्षकांना पुढील कायदेशीर कारवाई करण्याबाबत पत्र पाठवण्यात आले होते. त्यानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहाय्यक पोलिस फौजदार पालांडे अधिक तपास करत आहे.
महिन्याभरातील दुसरे प्रकरण
पॅरोल रजेवर आलेला आरोपी कारागृहात परत न जाण्याचा मागील महिन्याभरातील हा दुसरा प्रकार आहे. रत्नागिरीतील फाईक मुस्ताक करंबेळकर हा रजेनंतर पुन्हा कारागृहात न गेल्याने त्याच्यावरही गुन्हा दाखल झाला आहे. आता या दुसऱ्या आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे.